
नांदेड – जिल्ह्यात वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने जिल्ह्यातील १६ सराईत गुन्हेगारांना नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतील बहुचर्चित शेख शाहरुख उर्फ कबूतर शेख अजगर याचाही समावेश करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात २०२६ मध्ये तब्बल ३९ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.
जिल्ह्यात वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांसंदर्भात त्या त्या पोलीस ठाण्याकडून कलम ५६ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यामध्ये सखोल चौकशी करून सदरच्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करणे आवश्यक असल्याने त्यांना नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या १६ सराईत गुन्हेगारांमध्ये नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतील शेख शाहरुख उर्फ कबूतर शेख अजगर रा. खुदबईनगर नांदेड, आशिष अशोक तारू रा. वाघाळा, सुशील मनोहर गावखोरे रा. जयहिंद नगर नांदेड, दत्ता शिवाजी पवार रा. वसरणी नांदेड, शिवाजीनगर ठाणे हद्दीतील विवेक अनिल नवघडे रा. जयभीम नगर नांदेड, जीवन उत्तम शंकपाळ रा. आंबेडकरनगर नांदेड, शुभम उर्फ शिवा जालिंदर दवणे राहणार जयभीम नगर नांदेड, विमानतळ ठाणे हद्दीतील अरबाज उर्फ अब्बु आरिफ पठाण रा. गोविंदनगर, नांदेड, नितेश उर्फ नितीन परमेश्वर इंगळे रा. शिवनगर तरोडा नांदेड, इतवारा ठाणे हद्दीतील शाहरुख उर्फ मॅडी सय्यद एजाज रा. चौफळा नांदेड, किशन राजू कुरील रा.जुना मोंढा नांदेड, शेख अनवर शेख अमर रा. किल्ला रोड इतवारा नांदेड, वजीराबाद ठाणे हद्दीतील रोहन माधव नवघडे रा. देगाव चाळ नांदेड, सुजल अनिल सदावर्ते रा. देगाव चाळ नांदेड, लोहा ठाणे हद्दीतील मारुती व्यंकटी शेळके रा. लोहा आणि कंधार ठाणे हद्दीतील प्रदीप अरुण टापरे रा. रुई ता. कंधार यांचा समावेश आहे.
चार महिन्यात १४ टोळ्यांमधील ३९ गुन्हेगार हद्दपार..!नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी २०२६ मध्ये कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये आतापर्यंत १४ टोळ्यांमधील ३९ गुन्हेगारांना नांदेड जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील धोकादायक व्यक्तींना स्थानबद्ध करण्यासंबधाने चालू वर्षात २२ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. नऊ व्यक्तींना एमपीडीए कायद्यांतर्गत एका वर्षासाठी कारागृहातच स्थानबद्ध केले आहे. त्याचवेळी चालू वर्षात महाराष्ट्र पोलीस अधिनियमांचे विविध कलमाने एमपीडीए अंतर्गत एकूण ९४ प्रस्तावावर हद्दपारीची कारवाई सुरू आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली.



