महापालिका

नांदेड शहरात २५ मे पासून खोदकाम होणार बंद..!

खोदलेल्या कामावरही महापालिका करणार दहा दिवसात मलमपट्टी

नांदेड – नांदेड शहरात १२ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शहरातील शहराची उडालेली दाणादाण लक्षात घेऊन आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शहरात २५ मे पासून कोणत्याही कामासाठी महापालिकेकडून खोदकाम केले जाणार नाहीत असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्याचवेळी शहरातील नालेसफाईलाही गती देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नांदेड शहरात १२ मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात धांदल उडाली. शहरात स्वच्छता ठेकेदार आर. अँड बी. कडून स्वच्छतेची कामे होत नसल्याने रस्त्यावरील नाल्या मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. शहरातील विविध भागात घंटागाडी आणि स्वच्छता कर्मचारी जातच नसल्याने नागरिकांनी रस्त्यावर फेकलेला कचरा नालीमध्ये जमा झाला. परिणामी नाल्या तुंबल्या. त्याचा फटका केवळ एक ते दीड तास झालेल्या पावसाने संपूर्ण शहराला बसला. शहरातील वेगवेगळ्या भागातील प्रमुख रस्त्यावर पाणीच पाणी झाले. दुसरीकडे शहरातील अंतर्गत भागात तर रस्त्यांची आणि स्वच्छतेचे तीन ते तेराच उडाले आहेत.

शहरालगतच्या वाढीव वस्त्यांमध्ये तर स्वच्छता कर्मचारी फिरकतही नाहीत. नवीन नांदेडातील कौठा, असर्जन वसरणी, भीमवाडी, असदवन तर जुन्या नांदेड आतील ब्रह्मपुरी, बिलालनगर, देगलूर नाका, हैदरबाग आदी भागात तर स्वच्छता कर्मचारी फिरकतही नाहीत. परिणामी या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

महापालिकेने पावसाळी कामांना प्रारंभ केला खरा परंतु अपेक्षित गतीने काम होत नसल्याने आणि १२ मे च्या एकाच पावसाने शहराची झालेली दुरवस्था पाहता महापालिका आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी १५ मे रोजी स्वच्छता विभागाची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. स्वच्छता ठेकेदार आर.अँड बी. ला पाठीशी घालू नका असा इशाराही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह क्षेत्रिय अधिकाऱ्यांना दिला. पावसाळापूर्व कामाची गती वाढविण्यासाठी सूचना देताना यांत्रिक मशिनरीही प्रत्येक प्रभागाला वेगळी द्यावी असे आदेश दिले. त्यानुसार आता मनपाच्या प्रत्येक प्रभागात पावसाळा पूर्व कामासाठी एक टिप्पर, एक पोकलेन मशीन आणि एक जेसीबी देण्यात आली आहे. आता तरी पावसाळापूर्व कामांचा वेग वाढेल अशी अपेक्षा आहे. नांदेड शहरात मोठ्या नाल्यांची संख्या ८९ आहे. पोकलेनद्वारे साफ करावयाच्या नाल्यांची संख्या ३२ आहे. तर मनुष्यबळाद्वारे सफाई करावयाच्या नाल्यांची संख्या १८४ इतकी आहे. प्रत्येक प्रभागात २० अतिरिक्त मजूरही देण्यात आले आहेत.

नांदेड शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १४ रस्त्यांची कामे सुरू आहेत. हे कामे काही ठिकाणी पूर्ण झाले असले तरीही अनेक ठिकाणी नाल्यांची जोडणी न झाल्याने पाणी त्या त्या भागात जमा होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची उंची जास्त झाली असल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी भीषण होऊ नये यासाठी तात्काळ नालेजोडणी करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात आली आहे. नवीन नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ अडथळे आल्याने पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला होता. ही बाब बाब लक्षात येताच आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी सदर प्रकरणात राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा रस्ता खुला करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कामाला प्रारंभही झाला आहे

शनिवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मॉक ड्रील…महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विभागाचाही आढावा घेतला. १८ मे रोजी आपत्ती व्यवस्थापन विभागाची मॉक ड्रील काळेश्वर येथे होणार आहे. महापालिकेकडे दोन बोटी आहेत. प्रत्येक रेस्क्यू टीमसोबत प्रशिक्षित चार जीवरक्षकही दिले जाणार आहेत. पावसाळा संपेपर्यंत हे जीवरक्षक कार्यरत राहतील असे आयुक्त डॉ. डोईफोडे म्हणाले.

चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती…नांदेड शहरातील काही ठराविक भागात पाणी तुंबण्याचा वारंवार प्रकार घडतो. ही बाब टाळण्यासाठी आता महापालिकेच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता दिलीप आरसुडे, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, उपायुक्त कारभारी दिवेकर यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी शहरातील अबचलनगर, बाफना, अनुराधा पॅलेस परिसर, वसंतराव नाईक चौक आणि दशमेशनगर या भागात पाणी साचणार नाही यासंदर्भात उपाययोजना करावयाच्या आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!