महापालिका

नांदेड महापालिका करणार १९० पदांची सरळ सेवा भरती 

महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचा आयुक्त पदावरील एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण, आगामी वर्षात शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ही प्रयत्न

नांदेड – महापालिकेच्या उत्पन्नासाठी वेगवेगळे प्रयत्न करून ते प्रयत्न यशस्वी करणाऱ्या तसेच महापालिकेचे उत्पन्न भविष्यातही कायम वाढते राहावे यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ एक जून रोजी पूर्ण होत आहे. या एका वर्षाच्या कार्यकाळात महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता करात १५ टक्के, पाणीपट्टीमध्ये ५० टक्के आणि विकास शुल्कामध्येही ५० टक्के वाढ करून महापालिकेचा आर्थिक कारभार सुरळीत करण्यासाठी आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी वर्षभर प्रयत्न केले आहेत. त्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यशही आले आहे .

नांदेड महापालिका ही ड वर्गातील महापालिका आहे पुण्यातील अनुभव गाठीशी घेऊन डॉ. महेशकुमार डोईफोडे हे १ जून २०२३ रोजी नांदेड महापालिकेत आयुक्तपदी रुजू झाले. महापालिकेची एकूणच आर्थिक स्थिती पाहून यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचे प्रारंभीच त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार महापालिकेच्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढवावा यासाठी प्रयत्न सुरू केले. यामध्ये. शहरात असलेल्या अनधिकृत नळ जोडण्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत एक नव्हे दोन नव्हे तर ३ हजार ३७० जोडण्या अनधिकृत असल्याचे निदर्शनात आले. या जोडण्या त्यांनी अधिकृत केल्या. यातून महापालिकेला प्रतिवर्षी आता पावणे तीन कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. काबरानगर येथील गाळ्यांच्या माध्यमातूनही साडेचार कोटींचे उत्पन्न महापालिकेला त्यांनी प्राप्त करून दिले आहे. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे नांदेड महापालिकेचे असलेले ७० मोकळे भूखंड महापालिकेच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया आयुक्त डोईफोडे यांनी पूर्ण केली आहे. या जागांना तार फिनिशिंग करून महापालिकेच्या नावाचा बोर्डही बसवण्यात आला आहे. महापालिकेमध्ये वीज निर्मितीसाठी स्वयंपूर्णता यावी यासाठी १५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. शहरात आगामी पावसाळ्यात २५ हजार झाडे लावण्याची तयारी केली जात आहे. यासाठी ४०० ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत.

नांदेड महापालिकेच्या स्थापनेपासून प्रलंबित असलेले कर्मचारी सेवा प्रवेश नियम राज्य शासनाकडून आयुक्त डोईफोडे यांच्याच कार्यकाळात मंजूर झाले आहेत. यामुळे सरळ सेवा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आगामी वर्षातही महापालिकेने वेगवेगळे उद्दिष्ट ठेवले असल्याचे आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी सांगितले. महापालिकेतील अत्यावश्यक सेवेतील पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी १९० पदांची सरळ सेवा भरती केली जाणार आहे. यामध्ये अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग आणि अभियांत्रिकी विभागातील विविध पदांचा समावेश आहे. ही भरती वर्षभरात पूर्ण केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड महापालिकेच्या एकूण १६ शाळा आहेत. इयत्ता आठवीपर्यंत महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेता येत होते. आता आगामी शैक्षणिक वर्षापासून जंगमवाडी येथील महापालिका शाळेत नववी आणि दहावी वर्गाचीही सुरुवात होणार आहे. ‘आपला दवाखाना’ अंतर्गत शहरातील विविध १९ ठिकाणी मनपा रुग्णालय सुरू केली जाणार आहेत.  महापालिकेचा उत्पन्न वाढीसाठी महापालिकेच्या बंजारा होस्टेलच्या बाजूला असलेल्या जवळपास एक एकर जागेवर १५० गाळे नव्याने उभारले जाणार आहेत. हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला असून यासाठी निविदाही काढल्या जाणार आहेत.

महापालिकेवर आजघडीला कर्जाचाही डोंगर उभा आहे, कर्मचाऱ्यांचे देणेही आहे. १३५ कोटी रुपये कर्मचाऱ्यांचे विविध थकबाकीपोटी द्यावे लागणार आहेत. त्याचवेळी ठेकेदारांचे ७५ कोटी, महावितरण आणि जलसंपदा विभागाचे ३५ कोटी रुपये आणि २००८ पासूनच्या वेगवेगळ्या भूसंपादनानापोटी तब्बल ३५० कोटी रुपये महापालिकेला अद्यापही देणे आहे. तर नव्याने आता ८४ कोटीचे कर्ज हे महापालिका घेणार आहे. या सर्व प्रक्रियेत महापालिकेची आर्थिक घडी सावरण्यासाठी उत्पन्न वाढीसाठी प्राधान्याने प्रयत्न केले जात असल्याचे आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी सांगितले.

नांदेड शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न…नांदेड महापालिकेला शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अमृत २ मध्ये १६७ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजनेची कामे केली जाणार आहेत. हे कामे निविदा प्रक्रियेत अंतिम टप्प्यात आहेत. या कामानंतर शहराला दररोज पाणीपुरवठा देणे शक्य होणार असून त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. शहरात असलेल्या २५ हजार पथदिव्यावर एलईडी बसवण्याचे कामही आगामी वर्षभरात पूर्ण होणार आहे. यातून वीज बिलाची बचत होईल. त्याचवेळी शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. यातून शहरातील सर्व मालमत्तांना कर आकारणी केली जाणार आहे. गोदावरी नदी संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शहरात महापालिकेच्या वतीने पाच दशलक्ष लिटर क्षमतेचा टरशरी ट्रीटमेंट प्लांट उभारून रेल्वे आणि बांधकामासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!