
नांदेड – नांदेड महापालिका स्थायी समिती सभापतीपदी भाजपाचे विरेंद्रसिंघ गाडीवाले यांची तर महिला, शिक्षण व बालकल्याण समिती सभापतीपदी भाजपाच्या सदिच्छा सोनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या समितीच्या उपसभापती म्हणून निरंजना लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही समितींच्या विशेष सभेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या निवडीप्रसंगी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांची उपस्थिती होती.
महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी आगामी काळात निश्चितपणे प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया नूतन सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी दिली. महापालिकेत येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी थेट डिजिटल प्लॅटफॉर्म महापालिका निश्चितपणे उभा करेल असेही ते म्हणाले. महापालिका उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असले तरी आगामी काळात महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महापालिकेवरील कर्जाबाबत विचारणा केली असता महापालिकेची पत आहे म्हणूनच कर्ज घेतले जाते. विकासकामे पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. कर्जाची परतफेडही होते, म्हणून कर्ज दिले जाते. महिला, शिक्षण व बालकल्याण समिती सभापती सदिच्छा सोनी यांनी महापालिका शाळा डिजिटल तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. उपसभापती निरंजना लांडगे यांच्यासह तीनही नूतन पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, खा. अजित गोपछडे, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर आदी पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
स. विरेंद्रसिंघ गाडीवाले अपराजित योद्धा… नांदेड महापालिका स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकीत विजय मिळवणारे स. विरेंद्रसिंघ गाडीवाले हे नांदेड महापालिकेतील एकमेव अपराजित योद्धा ठरले आहेत. त्यांना महापालिकेत यापूर्वी स्थायी समितीचे सभापती म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांनी सभागृह नेते म्हणूनही त्यांनी दहा वर्षांहून अधिक काळ सभागृहात आपल्या कामाची छाप सोडली आहे. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून १९९७ मध्ये ते शिवसेना पक्षाकडून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी पाठीमागे वळून पाहिलेच नाही. काँग्रेस आणि आता भाजपकडून ते निवडून आले आहेत. महापालिकेत पिता पुत्र निवडून येण्याचा दोनवेळा पराक्रम गाडीवाले पिता पुत्रांनी केला आहे. त्यांचे पिता बलवंतसिंघ गाडीवाले हे गुरु ता गद्दी कालावधीत महापौर राहिले आहेत. विरेंद्रसिंघ गाडीवाले हे यापूर्वीही ३१ डिसेंबर २०२० ते २ डिसेंबर २०२१ या कालावधीत स्थायी समिती सभापती राहिले आहेत. त्यांना दुसऱ्यांदा ही संधी प्राप्त झाली आहे.



