
नांदेड – नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी येथील पंप हाऊसमध्ये १ मे रोजी मध्यरात्री विद्युत मोटारीत तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे धरणातून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला असून आगामी चार दिवस नांदेड शहराला पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नांदेडकरांनी आहे त्याच पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले आहे.
नांदेड शहराला विष्णुपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. येथील पंप हाऊस मध्ये १ मे रोजी मध्यरात्री विद्युत मोटारीत तांत्रिक बिघाड झाला आहे. जॉइंट निसटल्याने शहराला प्रकल्पातून होणारा कच्चा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी नांदेड शहरातील उत्तर भागाचा तसेच देगलूरनाका, वजिराबाद आणि खडकपुरा भागात पुढील चार दिवस पाणीपुरवठा होणार नाही हे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. सर्व यंत्रणा दुरुस्तीच्या कामाला लागल्या आहेत. परंतु हा तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी जवळपास तीन ते चार दिवसाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे नांदेड शहरात चार दिवस पाणीपुरवठा होणार नाही.
नांदेड शहरातील नागरिकांनी या तांत्रिक बिघडाची नोंद घेऊन महापालिकेत सहकार्य करावे तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी काटकसरीने वापरावे, पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही महापालिकेने केले आहे.
दरम्यान, या तांत्रिक बिघाडाचा नांदेड दक्षिण भागात कोणताही परिणाम होणार नाही. संपूर्ण सिडको- हडको परिसर, चौफाळा आणि नंदगिरी किल्ला परिसरात होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहील, असेही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.