नांदेड स्क्रिप्ट विशेष

खुशखबर..! कौठ्यातील रवी नगरला दिवाळीत मिळणार २४ तास पाणी..!

नांदेड महापालिकेचा पायलट प्रोजेक्ट दिवाळीत साकारणार... २१०० मालमत्ता धारकांना मिळणार लाभ 

नांदेड – नवीन नांदेडातील कौठा भागात असलेल्या रवी नगरात दिवाळीत २४ तास पाणी देण्याचा महापालिकेचा पायलट प्रोजेक्ट कार्यान्वित होणार आहे. यासाठीची आवश्यक ती संपूर्ण तयारी महापालिकेने पूर्ण केली असून अंतिम टप्प्यात आता मालमत्ताधारकांच्या नळाला मीटर बसविण्यात येणार आहेत. हा पायलट प्रोजेक्ट पाच टप्प्यांमध्ये कार्यान्वित केला जाणार असून या प्रकल्पाच्या यशानंतर संपूर्ण शहराला मीटरद्वारे पाणीपुरवठा देण्याची तयारी महापालिकेकडून केली जात आहे.
नांदेड शहरात एकूण ६४ हजार नळ कनेक्शन आहेत. शहराची एकूण लोकसंख्या पाहता शहराला पाणीपुरवठ्यासाठी होणारा खर्च आणि पाणीकरातून मिळणारी रक्कम यात दुप्पट फरक आहे. राज्यातील अनेक शहरात मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. हाच प्रकल्प आता नांदेड महापालिकेकडूनही राबविला जाणार आहे. नवीन नांदेडात कौठा भागात हा पायलट प्रोजेक्ट ऐन दिवाळीत कार्यान्वित करण्याच्या महापालिका पाणीपुरवठा विभागात हालचाली सुरू आहेत. कौठा भागातील २१०० मालमत्ताधारकांना दिवाळीपासून २४ तास पाणी उपलब्ध राहील, याची ग्वाही महापालिका देणार आहे. त्याचवेळी हे पाणी मीटरद्वारे दिले जाईल. कौठ्यामध्ये पाच टप्प्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. कौठा येथे महापालिकेचा जलकुंभ आहे. या जलकुंभावरून हा पाणीपुरवठा केला जाईल.
महापालिकेच्या या पायलट प्रोजेक्टसाठी पाणीपुरवठा विभागाकडून २ कोटी ६७ लाख रुपये खर्च केले जात आहेत. यामध्ये नळधारकांना महापालिका अल्ट्रा सॉनिक कंपनीचे अत्याधुनिक मीटर देणार आहे. ज्याद्वारे  रवीनगर वासियांना २४ तास पाणी उपलब्ध राहील; मात्र या पाण्याची नोंद या मीटरवर होईल. ‘ जितका पाणी उपसा तितके बिल’ असे धोरण राहणार आहे. नळ धारकांना कोणत्या दराने नेमके किती देयक दिले जाईल, ही बाब अद्याप अंतिम झाली नाही. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे या बाबतीत निर्णय घेणार आहेत.
कौठा भागात हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर महापालिका पुढे शहरातील भाग्यनगर, बोरबन, वजिराबाद आदी भागांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. नागरिकांना सध्या आहे त्या पाणीपट्टीपेक्षा कमी बिल येईल असे दर राहतील, असेही महापालिकेचे शहर अभियंता सुमंत पाटील यांनी स्पष्ट केले. पण त्याचवेळी नागरिकांना काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार आहे. महापालिका दरवर्षी पाणीपुरवठ्यासाठी जवळपास ३५ कोटी रुपये वर्षाला खर्च करत असते. पाणी पुरवठ्यासाठी होणारा खर्च आणि पाणी करातून मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ निश्चितच बसत नसल्याने महापालिका हळूहळू पाणीपुरवठ्याच्या धोरणामध्ये बदल करणार आहे. त्यातील हे पहिले पाऊल असल्याचे शहर अभियंता सुमंत पाटील म्हणाले.

महापालिका अधिकाऱ्यांच्या निवासस्थानीही मीटर..! नांदेड महापालिका हा पायलट प्रोजेक्ट राबवत असताना महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या निवासस्थानीही मीटर बसवण्यात येणार आहेत. ज्याद्वारे ‘ आधी स्वतः केले नंतर लोकांशी सांगितले’ हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आल्या असताना महापालिकेचा हा प्रयोग कितपत यशस्वी होईल याकडे लक्ष लागले आहेस. त्याचवेळी भावींकडून महापालिकेच्या या पायलट प्रोजेक्टला किती प्रतिसाद मिळतो, हेही पाहणे निश्चितच उत्सुकतेचे ठरणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रशासकीय काळापूर्वीचे सत्ताधारी आणि विरोधक या प्रकल्पाचे स्वागत करतील की तो धुडकावून लावतील हेही पाहणे मनोरंजक ठरणार आहे. जवळपास १० वर्षापूर्वी शहरातील अशोकनगर भागात महापालिकेने हा प्रयोग करण्याचे निश्चित केले होते; पण तो प्रकल्प आतापर्यंत मूर्त स्वरूपात येऊ शकला नाही आता महापालिकेने रवी नगरला या पायलट प्रोजेक्टसाठी निवडले आहे.

Related Articles

One Comment

  1. रवी नगर रोड, तिरुमल्ला सोडा सेंटर मागे, जुना कौठा, नांदेड.431603.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!