
नांदेड – नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरात असलेल्या गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर ४० दिवस उत्सव मेल्याच्या माध्यमातून करोडो रुपयांची कमाई करून उत्सव मेला चालक गायब झाला आहे. त्यानंतर थकीत भाड्यापोटी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, भुसावळ आधी ठिकाणचे हिंदी पट्टीतील १०० ते १५० मजूर नांदेडमध्ये पंधरा दिवसापासून अडकले आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याचीही आता आबाळ होत आहे. मूळ उत्सव मेला चालकास पकडून त्याच्यावर कारवाई करावी, मात्र आम्हाला घरी जाऊ द्या असा टाहो या मजुरांमार्फत फोडला जात आहे.
नांदेड येथील हिंगोली गेट भागात असलेल्या मैदानावर औरंगाबादच्या एका व्यापाऱ्याने उत्सव मेला सुरू केला. हे मैदान गुरुद्वारा बोर्डाकडून भाड्याने घेण्यात आले होते. याबाबत आवश्यक तो करार करण्यात आला होता. भाडे निश्चित करण्यात आले होते. प्रारंभीच्या टप्प्यात मेला चालकाने भाडे नियमितपणे भरले. मात्र शेवटच्या टप्प्यात त्याने नांदेडमधून उत्सव मेल्यामध्ये असलेल्या सर्व मजूर व लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना इथेच सोडून पलायन केले आहे. गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानाचे भाडेही त्याने अदा केले नाही.
हे भाडे अदा करावे आणि मेल्यासाठी आणलेले साहित्य घेऊन जावे अशी भूमिका बोर्डाने घेतली आहे. या उत्सव मेल्यात देशभरातून मजूर आणि लहान व्यापारी व्यवसाय करण्यासाठी आले होते. यावर्षी असलेले फिश टनेल हे नांदेडकरांसाठी आगळे वेगळे वैशिष्ट्य ठरले होते. या फिश टनेलला पाहण्यासाठी जिल्हाभरातून नागरिक येत होते. विशेषतः लहान मुलांसाठी येथे अनेक खेळणी उपलब्ध होती. त्यातून उन्हाळ्याच्या सुट्टीत येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यातून काही प्रमाणात चांगला व्यापारही झाला.
थकीत भाड्याच्या या प्रकारातून मजुरांची मात्र येथे मोठी हेळसांड होत आहे. ४० दिवसांसाठी असलेला हा उत्सव मेला १६ जून रोजी संपणार होता. पुढे दोन दिवस त्याची मुदत वाढली. त्यानंतर हा मेला संपवण्यात आला. त्याचवेळी भाडे थकीत असल्याने मजुरांना अद्यापही घराकडे जाता आले नाही. देशभरातील हे मजूर आपल्याला घरी कधी जाता येईल याकडे डोळे लावून बसले आहेत. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भर पावसात या कुटुंबीयांना राहावे लागत आहे. काही कुटुंब घराकडे परतले असले तरीही मेल्यात आणलेल्या साहित्यासाठी येथे अनेकजण थांबून आहेत.
थकीत भाड्याचा हा विषय संपविण्यासाठी मेला चालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मेलाचालक सध्या सर्वच संपर्क बंद करून गायब आहे. औरंगाबाद येथील हा मेला चालक सध्या गायब असून त्याचा कोणताही संपर्क होत नसल्याने या मजुरांना मात्र अडकून रहावे लागले आहे.
या सर्व प्रकारात या मजुरांनी व लहान व्यापाऱ्यांनी वजीराबाद पोलीसांकडे एक निवेदन दिले आहे. मात्र त्यानंतरही त्यांच्या सुटकेचा कोणताही मार्ग निघाला नाही. आता प्रशासनानेच आम्हाला घरी जाण्यासाठी मार्ग करून द्यावा, अशी मागणी या मजुरांकडून केली जात आहे. कोट्यावधी रुपयांच्या या उलाढालीत सामान्य मजूर मात्र भरडला जात आहे.
प्रशासनाने यापूर्वीच केले होते सावध… हिंगोली गेट येथील मैदानावरील कराराप्रकरणी जिल्हा प्रशासनाने बोर्डाला यापूर्वीच सावध केले होते. भाडेवसुली संदर्भाने आवश्यक ती प्रक्रिया केल्यानंतरच मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केली होती. मात्र या सूचनेचे पालन योग्य प्रमाणात झाले नाही आणि थकीत भाड्याचा विषय पुढे आला. मात्र या थकीत भाड्याचा फटका सामान्य मजुरांना बसला आहे. मूळ उत्सव मेला चालक मात्र गायब होण्यात यशस्वी झाला आहे.
महावितरणलाही घातला लाखोंचा गंडा…या उत्सव मेल्यामध्ये असलेला विद्युत रोषणाईचा झगमगाट हा डोळे दीपवणारा होता. उत्सव मेल्यात प्रवेश केल्यानंतर तर प्रत्येक ठिकाणी विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसत होते. पण दूरवरूनही या मेल्यातील आकर्षक विद्युत रोषणाई लक्षवेधी होती. महावितरणकडे प्रारंभी काही रक्कम भरल्यानंतर येथे महावितरणने येथे वीजपुरवठा सुरू केला. मात्र अंतिम किती रुपयांचे बिल थकीत आहे, ही बाब गुलदस्त्यातच आहे. महावितरणची ही रक्कमही न भरताच उत्सव मेला चालक गायब झाला आहे. त्यामुळे महावितरणलाही या मेला चालकाने गंडविल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे आता महावितरणकडून या मेला चालकाविरोधात कोणती कारवाई होईल याकडे लक्ष लागले आहे.
गुरुद्वारा बोर्डाकडूनच ‘लंगर’ची सुविधा…हिंगोली गेट मैदानावर अडकलेल्या शंभर ते दीडशे मजुरांना पंधरा दिवसापासून येथे कोणतेही काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. ही बाब लक्षात घेता गुरुद्वारा बोर्डानेच या मजुरांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यांना गुरुद्वारा बोर्डाकडूनच लंगर पुरवले जात आहे. त्यामुळे त्यांचा जेवण्याचा प्रश्न सध्या तरी सुटला आहे. परंतु या मैदानावर असलेला गडद अंधार, सातत्याने होत असलेला पाऊस, घाणीचे साम्राज्य अशा परिस्थितीत या मजूर महिला, पुरुष, लहान लहान बालकांनी येथे राहायचे कसे हाच प्रश्न आता पुढे येत आहे.
कामगार कल्याण कार्यालयाला चौकशीचे आदेश- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत …या प्रकरणात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आता लक्ष घातले असून हिंदी पट्टीतील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, भुसावळ आदी ठिकाणचे शंभर ते दीडशे मजूर नांदेड अडकल्याप्रकरणी कामगार कल्याण कार्यालयाला चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे. हे सर्व असंघटित कामगार आहेत. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच या प्रकरणात आता लक्ष घातल्याने त्यांच्या घर वापसीसाठी आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. शनिवारी सायंकाळी या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी कामगार कल्याण कार्यालयाचे एक पथक हिंगोली गेट येथील उत्सव मेला ठिकाणी पोहोचले असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे.