प्रशासकीय

दुष्काळी उपाययोजनांसाठी नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज

पाणीटंचाई तक्रारी निवारणासाठी २४ तास ‘वॉर रूम’ कार्यरत राहणार ; नागरिकांसाठी १०७७ टोल फ्री हेल्पलाइन सुरू

नांदेड : अल-निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात यंदा अनियमित पर्जन्यमान झाले. ३१ ऑक्टोबर २०२६ अखेर सरासरीच्या केवळ ६६.९० टक्के पाऊस झाला आहे. परिणामी भूजल पातळीत घट झाली असून जिल्ह्यातील सर्व १६ तालुके दुष्काळसदृश घोषित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई, चारा टंचाई, जलसंधारणाची कामे, शेतकरी कर्जमुक्ती योजना तसेच विविध उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत राहणारा ‘वॉर रूम’ (मध्यवर्ती नियंत्रण कक्ष) स्थापन करण्यात आला आहे.

या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून पाणीटंचाई, चारा टंचाई, जलसंधारण आणि कर्जमुक्ती योजनेसंदर्भातील कामकाजाचा समन्वय साधण्यात येणार आहे. यासाठी पाच विशेष कक्ष स्थापन करून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणीटंचाई, चारा टंचाई व कर्जमुक्ती योजना तक्रार निवारण कक्षामार्फत टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मंजुरी, टँकर सुरू करणे, विहिरी व बोअरवेल अधिग्रहण तसेच कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे. या कक्षाचे प्रमुख संजय नागमवाड आहेत. जलसंधारण कक्षामार्फत तलावातील गाळ काढणे, नाला सरळीकरण व रुंदीकरण, सिमेंट नाला बांध, गॅबियन बंधारे, जलयुक्त शिवार, शेततळी व क्षेत्र उपचाराची कामे राबविण्यात येणार आहेत. किशोर कुऱ्हे यांच्याकडे या कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

माहिती तंत्रज्ञान कक्षामार्फत विविध योजनांची माहिती संकलित करून ॲपवर अपलोड करणे, टँकरच्या जीपीएस यंत्रणेवर देखरेख ठेवणे व आवश्यक सादरीकरण तयार करण्याचे काम केले जाणार आहे. या कक्षाचे प्रमुख प्रदीप डुमणे आहेत. प्रसारमाध्यम कक्षामार्फत दुष्काळ व टंचाईसंदर्भातील बातम्यांचे संकलन, उपाययोजनांची माहिती आणि जनजागृतीसाठी प्रसिद्धीपत्रके जारी करण्यात येणार आहेत. या कक्षाची जबाबदारी नयना कुलकर्णी व चंद्रकांत कारभारी यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच २४ तास कार्यरत तक्रार निवारण कक्षामार्फत नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेऊन संबंधित विभागाकडून त्याच दिवशी तातडीने कार्यवाही करून घेतली जाणार आहे. या कक्षाचे प्रमुख किशोर कुऱ्हे व बारकुजी मोरे आहेत.

नागरिकांसाठी टोल फ्री हेल्पलाइन सुरू…दुष्काळ, पाणीटंचाई, चारा टंचाई व जलसंधारणासंदर्भातील तक्रारी नोंदविण्यासाठी तसेच अधिकृत माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०७७ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२३५०७७ यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही उपस्थित राहून कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!