Uncategorizedप्रशासकीय

नांदेड जिल्ह्यात १२ नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीची रविवारी मतमोजणी 

बिलोली, उमरी न.प.चा दोन फेऱ्यातच लागणार निकाल, धर्माबादमध्ये सर्वाधिक ११ टेबलवर होणार मतमोजणी, पोलीस दलाचाही राहणार तगडा बंदोबस्त..!

नांदेड – जिल्ह्यातील बारा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून सुरू होणार आहे. बिलोली आणि उमरी नगरपरिषदेचा पहिल्या दोन फेऱ्यांमध्येच निकाल स्पष्ट होईल तर मतमोजणीच्या सर्वाधिक सहा फेऱ्या या हदगाव आणि भोकर नगर परिषदेच्या मतमोजणी दरम्यान होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व १३ मतमोजणी केंद्रावर जिल्हा पोलीस दलांकडून तगडा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने पोलीस दलाकडून ड्रोनचाही उपयोग केला जाईल असेही जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात रविवारी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होईल. देगलूर येथे उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीत मतमोजणी होईल. या मतमोजणीसाठी ५५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. १३ टेबलवर चार फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार आहे. बिलोली येथे दहा टेबलवर मतमोजणी होईल. दोन फेऱ्यांमध्येच येथे निकाल येणे अपेक्षित आहे. मतमोजणीसाठी ३७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नगर परिषदेच्या कार्यालयात ही मतमोजणी होणार आहे. कंधारमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होईल. मतमोजणीसाठी ३७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत निकाल हाती येतील. येथे दहा टेबलवर मतमोजणी होणार आहे. मुदखेड नगर परिषदेची मतमोजणी नगरपरिषद कार्यालय मुदखेड येथेच होणार आहे. पाच टेबलवर पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल. मतमोजणीसाठी २५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हदगाव येथे नगरपरिषद कार्यालयात होणाऱ्या मतमोजणीसाठी २५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून पाच टेबलवर होणाऱ्या मतमोजणीत पाचव्या आणि सहाव्या फेरीत निकाल हाती येतील. किनवट येथे सहा टेबलवर पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणे अपेक्षित आहे. किनवट नगरपरिषदेच्या कार्यालयात ही मतमोजणी होईल. २८ कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहेत. हिमायतनगर नगरपंचायतीची मतमोजणी तहसील कार्यालयात होणार आहे. सहा टेबलवर चार आणि पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. २८ कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. उमरी नगर परिषदेची मतमोजणी तहसील कार्यालयात होईल. ३७ कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात करण्यात आले आहेत. दोन फेऱ्यांमध्ये येथे निकाल अपेक्षित आहे. आठ टेबलवर मतमोजणी होणार आहे. धर्माबाद येथे सर्वाधिक ११ टेबलवर मतमोजणी होणार आहे. तीन फेऱ्यांमध्ये निकाल अपेक्षित आहे. अग्निशमन केंद्राच्या बाजूस नगर परिषद सभागृहात ही मतमोजणी होणार आहे. ४२ कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात करण्यात आले आहेत. मुखेड येथे तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. तीन फेऱ्यांमध्ये अंतिम निकाल अपेक्षित आहे. दहा टेबलवर ही मतमोजणी होईल. ३७ कर्मचारी या मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. कुंडलवाडी येथे पाच टेबलवर चौथ्या आणि पाचव्या फेरीअखेर निकाल हाती येतील, अशी शक्यता आहे. कुंडलवाडीच्या के. रामलु मंगल कार्यालयात ही मतमोजणी होणार आहे. २५ कर्मचारी मतमोजणी करतील. भोकर नगर परिषदेची मतमोजणी ही नगरपरिषद कार्यालयात पार पडेल. २८ कर्मचारी ही मतमोजणी करतील. सहा टेबलवर पाचव्या आणि सहाव्या फेरी अखेर अंतिम निकाल हाती येईल. लोहा येथे तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. १० टेबलवर तिसऱ्या आणि चौथ्या फेरी अखेर निकाल हाती येण्याची शक्यता आहे. या मतमोजणीसाठी ३७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मतमोजणी दरम्यान राहणार तगडा पोलीस बंदोबस्त..! नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची मतमोजणी रविवारी होणार आहे. या मतमोजणी दरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दलाकडून ड्रोनद्वारेही पाहणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी हे बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. त्याचवेळी आरसीपी आणि एसआरपी ची नेमणूकही करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात २०० मीटरवर बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. निकालानंतर कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलीस दलाकडून घेण्यात येत आहे. निकालनंतर मिरवणुका, फटाके फोडणे आदीबाबत राजकीय पक्षांना  नोटिसाही बजावण्यात आल्याचे अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!