
अनुराग पोवळे
नांदेड – नांदेड विमानतळावर ३१ मार्चपासून नांदेड – बंगळुरू, नांदेड – दिल्ली – जालंधर ही विमानसेवा दररोज तर नांदेड – हैदराबाद आणि नांदेड -अहमदाबाद ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे आता नांदेडकरांसाठी आता दिल्ली दूर नही… तर देश विदेशातून नांदेड येथे श्री सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ही मोठी सोय होणार आहे.
‘स्टार एअर’ची ही विमानसेवा नांदेडसह परभणी, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव आदी जिल्ह्यातील प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे. नांदेड आता देशभरातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. जालंदर – दिल्लीमार्गे रविवारी दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी नांदेडला पोहोचणाऱ्या विमानातील प्रवाशांचे नांदेड येथे गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने स्वागत केले जाईल. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ‘स्टार एअर’ने दिलेल्या माहितीनुसार नांदेड ते बंगळुरू हे विमान नांदेडहुन सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे. ते सायंकाळी ६ वाजून ०५ बंगळूरू येथे पोहोचेल. तर बंगळुरू – नांदेड हे विमान बंगळूरूहून सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल नांदेडला हे विमान सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचणार आहे. नांदेड- दिल्ली हे विमान सकाळी नऊ वाजता सुटेल तर सकाळी ११ वाजता दिल्लीला पोहोचणार आहे. नांदेड ते हैदराबाद ही सेवा आठवड्यातून सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सुरू राहणार आहे. सायंकाळी ४:३० वाजता हे विमान नांदेडहून निघणार आहे. सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी हैदराबादला पोहोचेल. नांदेड – अहमदाबाद विमानसेवा सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी उपलब्ध राहील.
२०१७ मध्ये ‘उडान’ योजनेअंतर्गत नांदेड विमानतळावरून सुरू झालेली विमानसेवा काही दिवसातच गुंडाळण्यात आली होती. आता ‘स्टार एअर’च्या या विमानसेवेला प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळतो हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. नांदेडला येणाऱ्या भाविकांसाठी उपयुक्त असलेली अमृतसर, दिल्ली, चंदीगड, मुंबई, हैद्राबाद ही विमानसेवा कोरोना काळात बंद पडली होती. ही सेवा पूर्ववत सुरु व्हावी व भाविकांना या सेवेचा लाभ मिळावा अशी देश-विदेशातील भाविकांची इच्छा होती. अखेर ‘स्टार एअर’ या कंपनीने आदमपुर-गाजियाबाद-हजूर साहिब नांदेड व इतर स्थानांसाठी विमानसेवा सुरु केली आहे.
गेल्या काही काळात नांदेडहून गुजरातमधील ‘कुबेर भंडारी’ या धार्मिक स्थळावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये राजकीय मंडळींचा मोठा सहभाग आहे. जसजशी या स्थळाबाबत चर्चा होत आहे तसतशी तेथे जाणाऱ्या भाविकांची संख्याही वाढत आहे. ‘स्टार एअर’ने सुरू केलेल्या नांदेड – अहमदाबाद या मार्गावरील विमानसेवेचा ‘कुबेर भंडारी’साठी जाणारे भाविक लाभ घेऊ शकणार आहेत. अहमदाबादहून ‘कुबेर भंडारी’ला जाता येते. त्यामुळे या मार्गावरील विमानसेवेचा लाभ ‘कुबेरा’ला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करणारे भाविक निश्चितच घेतील.