
नांदेड – नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेल्या तब्बल ८० तोळे सोन्यावर बँकेच्या कॅश इन चार्ज आणि सर्विस मॅनेजरनेच डल्ला मारला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा डाव उघडकीस येऊ नये म्हणून दोघांनीही बँकेच्या लॉकरमध्ये खरे सोने काढून घेऊन ४१ तोळे बनावट सोने ठेवले होते. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाची नांदेडमध्ये डॉक्टर लेन भागात शाखा आहे. या शाखेत ग्राहकांनी कर्ज घेण्यासाठी सोने तारण म्हणून ठेवले होते. आठ ग्राहकांनी लॉकरमध्ये ठेवलेले ३९१ ग्राम सोने हे बँकेच्या कॅश इन्चार्ज असलेल्या आदित्य प्रकाश सेनगावकर आणि सर्विस मॅनेजर जीवन माधवराव जगदाळे यांनी संगनमत करून काढून घेतले. त्याचवेळी बँकेच्या लॉकरमधील ४१४ ग्रॅम सोने लंपास करून त्या ठिकाणी बनावट सोने ठेवले. या प्रकारात ८०५.९० ग्राम सोने या दोघांनी लंपास केले. या सोन्याची किंमत ८५ लाख ८१ हजार ५९७ रुपये दर्शविण्यात आली आहे. १८ मे पूर्वी हा प्रकार घडल्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणात बँक कॅश इन्चार्ज आदित्य प्रकाश सेनगावकर आणि सर्विस मॅनेजर जीवन माधवराव जगदाळे या दोघांविरुद्ध स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेचे मुख्य शाखा व्यवस्थापक राजीव अनंत कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम हे करीत आहेत.
या घटनेत कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे विश्वास ठेवायचा तरी कोणावर असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किंमती पाहता सामान्य माणूस आपल्याकडील किडूक मिडूक सोने बँकेत गहाण ठेवून आपल्या गरजा भागवण्यासाठी कर्ज काढत असतो. अशावेळी बँकेत आपले सोने सुरक्षित आहे असा विश्वास त्याच्या मनात असतो; मात्र याच विश्वासाला तडा जाणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे.



