
नांदेड – नांदेड शहरात स्पा सेंटरच्या नावाने थेट वेश्या व्यवसाय सर्रासपणे चालविला जात असल्याची बाब पोलिसांच्या गेल्या काही दिवसातील धाडसत्रावरून स्पष्ट झाली आहे. शहरातील मोर चौकात ग्रीन टी थाय स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर नांदेड स्थानिक गुन्हा शाखेने मंगळवारी धाड टाकून तीन पीडित महिलांची सुटका केली आहे. त्याचवेळी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोर चौक येथील ग्रीन टी थाय सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखा आणि मानवी वाहतूक व प्रतिबंधक कक्ष यांच्या पथकाने दोन शासकीय पंच आणि एका बनावट गिऱ्हाईकाच्या मदतीने सापळा रचला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बनावट ग्राहकाकडून ठरल्याप्रमाणे इशारा मिळताच पोलीस पथकाने सदर स्पा सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत गोविंद संभाजी सूर्यवंशी रा. सांगवी, महेश पांडुरंग कोकुलवार रा. सिडको आणि स्पा मालक परमिंदरसिंग चावला रा. महाराजा हॉटेलजवळ नांदेड या तिघांना अटक करण्यात आली आहे. स्पा मालक आणि मॅनेजर हे पैशांचे आमिष दाखवून पीडित महिलांकडून अवैध व्यवसाय करून घेत होते. एक कारवाईत पोलिसांनी गुजरात आणि पश्चिम बंगाल येथील ३ पीडित सुटका केली आहे. पोलिसांनी रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात रितेश कुलथे यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अर्चना पाटील, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रितेश कुलथे, गणेश लोसरवार, ज्ञानोबा कवठेकर तसेच अनैतिक मानवी वाहतूक व प्रतिबंधक कक्षातील पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड पोलीस अंमलदार अच्युत मोरे, यशोदा केंद्रे यांनी पार पाडली.
अनैतिक मानवी व्यापार वेश्या व्यवसायासाठी महिलांचे शोषण किंवा अशा प्रकारचे अवैध धंदे आपल्या परिसरात सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी तरी तर जवळच्या उलिश ठाण्याशी किंवा डायल 112 वर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचवेळी स्थानिक ठाणे हद्दीत कोणते व्यवसाय सुरू आहेत याची संपूर्ण माहिती त्या त्या ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलिसांना माहिती असते; मात्र आर्थिक लागेबांधे असल्यामुळे अशा अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे अशा अवैध धंदे चालकांचे फोफावत असल्याचे स्पष्ट होत आहे.
महापालिका मालिकेच्या इमारतीतही सुरू होता स्पा सेंटर..! नांदेड महापालिकेच्या मालिकेच्या महात्मा फुले मार्केटमध्ये वेलनेस स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर २ सप्टेंबर रोजी धाड टाकली होती. त्यापूर्वी वजिराबाद भागातील महापालिका मालकीच्या संकुलातही वजिराबाद पोलिसांनी अवैध स्पा सेंटरवर कारवाई केली होती. त्यानंतरही थेट महापालिकेच्या शिवाजीनगर येथील मोक्याच्या ठिकाणी इमारतीतच सुरू असलेल्या या अवैध वेश्या व्यवसायावरील धाडीमुळे शहरात एकच चर्चा झाली होती. त्यातच शिवाजीनगर ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही कारवाई करण्यात आली होती. महापालिका मालकीच्या इमारतीतील वेलनेस स्पा सेंटरमधून पोलिसांनी नेपाळ, नागालँड, नवी दिल्ली, ठाणे, पुणे अशा देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणावरील सात महिलांची सुटका करण्यात आली होती. त्यातच याच इमारतीत अवैधरित्या दारू विक्रीही सुरू आहे. थेट महापालिकेच्या या संकुलात सुरू असलेल्या या व्यवसायामुळे महापालिकेची नाचक्की झाली होती. वेलनेस सेंटर स्पा सेंटर बंद झाले असले तरीही अवैध दारू विक्री मात्र मोठ्या थाटात सुरू आहे. एका समाजसुधारकाच्या नावाने असलेल्या या इमारतीत थेट दारू विक्री होत असताना महापालिकेतील काही नगरसेवकांनी या संदर्भात तक्रारही केली होती मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.



