महापालिका

नांदेडमध्ये गोदावरीच्या महापुरात नावघाट पुलावरील मुख्य जलवाहिनी गेली वाहून

जुन्या नांदेडचा पाणीपुरवठा ३० सप्टेंबरपर्यंत राहणार ठप्प, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर, पूरपरिस्थिती ओसरल्यावरच पाणीपुरवठा होणार 

नांदेड – गोदावरी नदीला आलेल्या महापुरात जुन्या नांदेडला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी वाहून गेल्याने जुन्या नांदेडचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. गोदावरी नदीचा पूर शुक्रवारी सकाळी ओसरला. त्यावेळी जलवाहिनी वाहून गेल्याचा प्रकार समोर आला. पुराच्या काळातही चार दिवस पाणीपुरवठा झाला नाही. आता जलवाहिनी वाहून गेल्याने दुरुस्तीनंतरच जुन्या नांदेडातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. महापालिकेने ३० सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा होणार नसल्याचे कळविले आहे.
नांदेडमध्ये रविवारपासून विष्णूपुरी प्रकल्पातून कमी अधिक प्रमाणात विसर्ग सुरू आहे. सोमवारी रात्री हा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. मंगळवारी तर तब्बल २५ वर्षानंतर विष्णूपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडावे लागले. नांदेडमध्ये आलेल्या २००६ च्या महापुरातही विष्णूपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडण्यात आले होते. सप्टेंबर २०२५ मध्ये मात्र प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडून आतापर्यंतचा सर्वाधिक तब्बल २ लाख ६८ हजार क्युसेस विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला होता. परिणामी गोदावरीची पाणीपातळी धोक्याच्या इशारा पातळीवर म्हणजेच ३५२ मीटरवर पोहोचली होती.

गोदावरी नदीला आलेल्या महापुरात या पाण्याचा प्रवाह अतिशय वेगात होता. गोदावरी नदीवरील नावघाट पूल ३ दिवस पाण्याखाली गेला. त्यातच नावघाट पुलावर जुन्या नांदेडसाठी असलेली जलवाहिनी या पुराच्या पाण्यात वाहून गेली. नवीन नांदेडातील असदवन येथून आलेल्या ४५० एमएम व्यासाचे ३ पाईप महापुरात वाहून गेले. परिणामी जुन्या नांदेडचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे चार दिवसापासून जुन्या नांदेडात पाणी पुरवठा झाला नव्हता. आता नांदेडला आणखी चार दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. २७ सप्टेंबर रोजी तर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे या जलवाहिनीची दुरुस्ती महापालिका पाणीपुरवठा विभागाला करता येणे शक्य नाही. पावसाचा इशारा संपल्यानंतर आणि गोदावरीची पाणी पातळी कमी झाल्यानंतर ही दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. त्यामुळे जुन्या नांदेड वासियांना आता पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

महापालिकेने आता टॅंकरने जुन्या नांदेडात पाणीपुरवठा करण्यासाठी तयारी केली आहे. परंतु किल्ला आणि चौफाळा या दोन जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात प्रभावित होईल, हे निश्चित. या दोन जलकुंभावरून जुन्या नांदेडातील किल्ला, चौफाळा, होळी, रंगार गल्ली, मन्यार गल्ली, गाडीपुरा, महंतवाडी, मरघाट रोड, भावेश्वर नगर, बिलालनगर, चिरागगल्ली, गवळी गल्ली, गौतम नगर, पठाण गल्ली, बडा नाला, सराफा, जोशी गल्ली, गाडीपुरा, नावघाट, नरसिंह गल्ली, मारवाड गल्ली, आईना महाल टेकडी, न्यू फतेह बुरुज, कालापूल, धनगर गल्ली, जुनी मारवाड गल्ली, सीडी घाट, अरब गल्ली, बुरुड गल्ली, कुंभार टेकडी, पाठक गल्ली, सय्यदान, हनुमान मंदिर आदी भागाला तसेच चौफाळा जलकुंभावरून सुळटेकडी, हातजोडी, शाही दवाखाना, विणकर कॉलनी, मोमीनपुरा, गनिमपुरा, संघसेन नगर, पिवळी बिल्डिंग शांतीनगर, प्रीतीनगर, मंडई मोठी आदी भागात पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे नांदेड महापालिकेने कळवले आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!