
नांदेड – नांदेड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ईशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यासाठी सोमवारी रात्री रेड अलर्टचा ईशारा देताना ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभीच सात जूनपासून दमदार पाऊस होत आहे. याच दरम्यान आता आज सोमवारी रात्री हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. सोमवारी रात्री जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून ताशी ४१ ते ६१ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, झाडाखाली अथवा कच्च्या घरात थांबू नये असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या वादळी वारे आणि पावसात घरावरील पत्रे उडण्याची ही शक्यता असून याबाबतही नागरिकांनी खबरदारी घ्यावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या या इशार्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात मोनाली सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसात नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्याचवेळी एक महिलाही वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यापूर्वी नांदेड जिल्ह्याला सहा ते आठ जून दरम्यान हवामान विभागाने यलो अलर्ट दिला होता.




Mukhed nanded