
नांदेड – सामाजिक चळवळीत काम करत असताना बहुजन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. आता राजकीय भूमिका घेतली असली तरी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू अशी ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष सुखदेव चिखलीकर यांनी दिली.
बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव चिखलीकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात मुंबई येथे जाहीर प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशाबाबत सुखदेव चिखलीकर यांनी १५ मे रोजी नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी रिपाईचे राज्य संघटक विजय सोनवणे, जिल्हाध्यक्ष गौतम काळे, शहर महानगराध्यक्ष धम्मपाल धुताडे, मिलिंद शिराढोणकर आदींची उपस्थिती होती. आपण राजकीय भूमिका घेतली असली तरीही आगामी काळात सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सदैव पुढाकार घेऊ असेही चिखलीकर यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मुंबई येथील संविधान या निवासस्थानी त्यांनी रिपाईत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश घेत असताना रामदास आठवले यांनी सुखदेव चिखलीकर यांची मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष तसेच नांदेड लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. चिखलीकर यांच्या रिपाईतील प्रवेशामुळे पक्षाला बळकटी मिळेल तसेच समाजातील सामान्य घटकांना न्याय देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न कराव्या अशा शुभेच्छाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिल्या. या पक्ष प्रवेशावेळी राज्याचे संघटक विजय सोनवणे, पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष गौतम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुखदेव चिखलीकर यांच्यासोबत बहुजन संघर्ष सेनेचे पदाधिकारी राजेश चौदंते, जयपाल चिखलीकर, यश बहादुर आदींनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला.