सांस्कृतिक

महासंस्कृती महोत्सवाला नांदेडमध्ये गुरूवारपासून प्रारंभ

कुटुंबीयांसह कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

नांदेड :- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने नांदेड येथे 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवकालीन विविध मैदानी खेळांचा सहभाग असणारा नांदेडचा महासंस्कृती महोत्सव गुरुवारपासून सुरू होणार आहे. राज्यातील लोकप्रिय कलाकारांसोबत स्थानिक कलाकारांना देखील या महोत्सवात व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.   या सांस्कृतिक महोत्सवाचा आस्वाद नांदेडकरांनी कुटुंबीयांसह घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे

महासंस्कृती महोत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. या महासंस्कृती महोत्सव पूर्वतयारीच्या अनुषंगाने नियोजन भवन येथे बुधवारी बैठक घेण्यात आली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपविभागीय अधिकारी विकास माने, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, प्रकल्प संचालक संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार, विविध विभागाचे अधिकारी, समिती सदस्य आदींची उपस्थिती होती.

या महासंस्कृती महोत्सवात शिवकालिन व पारंपारिक मैदानी खेळ, विविध स्पर्धा, गीत, नृत्य, लोकगीत, आदिवासीचे पारंपारिक लोकनृत्याचे प्रकार इत्यादीची रसिकांना अनुभूती मिळणार आहे.

या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बुधवारी सायंकाळी पोलीस कवायत मैदान आणि नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती  मैदानाची पाहणी केली.

या महासंस्कृती महोत्सवात 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायं. 5  या कालावधीत शिवकालिन विविध मैदानी खेळांचे आयोजन पोलीस कवायत मैदानावर करण्यात आले आहे. यामध्ये खो -खो, कबड्डी, लेझीम, कुस्ती, मल्लखांब, आट्यापाट्या, घुंगुर काठी, लाठी-काठी, रस्सीखेच, गतका, लगोरी इत्यादी विविध खेळांचे प्रात्यक्षिक स्पर्धात्मक स्वरूपात होणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!