
नांदेड – नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर केले जाणार आहे. या स्थलांतरणासाठी तीन जागांचा पर्याय सुचविण्यात आला आहे. विशेष पथकाकडून या तीन जागांची पाहणी केली जाईल. विशेष पथकाचा अहवाल आल्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर त्याठिकाणी केले जाईल. ही सर्व प्रक्रिया दोन-तीन दिवसात पूर्ण होईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. याचा प्रवाशांसह एसटी चालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक अपघात या रस्त्यावरून होत आहेत. मात्र या रस्त्याचे काम करण्यासाठी बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर करणे आवश्यक आहे. या स्थलांतरणासाठी तीन जागांचा पर्याय पुढे आला आहे. या पर्यायांची पाहणी एका विशेष पथकाकडून केली जाईल. या पथकाच्या पाहणीनंतर अहवाल प्राप्त होताच मध्यवर्ती बसस्थानकाचे स्थलांतर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अबचलनगर येथील मोकळ्या जागेवर बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात येईल असे सांगण्यात येत होते. मात्र या बाबीस बाबा फतेहसिंघ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने निवेदन देऊन विरोध करण्यात आला आहे. याबाबत गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंघ यांच्याकडे निवेदनही देण्यात आले आहे. त्याचवेळी गुरुद्वारा बोर्डानेही अबचलनगर येथील जागा तात्पुरत्या बसस्थानकासाठी देण्यास विरोध दर्शविला आहे. या सर्व प्रकाराबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मात्र नाराजी व्यक्त केली असून सार्वजनिक उद्देशासाठी अशा अडचणी आणणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
नांदेड बसस्थानकाच्या कायमस्वरूपी स्थलांतरणासाठी पर्यायांचा विचार सुरू…नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाच्या कायमस्वरूपी स्थलांतरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीच प्रशासनाकडून राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना जागा सुचविण्यात आल्या आहेत. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत स्वीकृती प्राप्त होतात मध्यवर्ती बसस्थानकाचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येईल. याबाबतही प्रशासकीय पातळीवर गतिमान हालचाली सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ‘नांदेड स्क्रिप्ट’शी बोलताना स्पष्ट केले आहे.