
नांदेड – जुनी केस मागे घेण्याच्या कारणावरून खडकपुरा भागातील दर्गा हजरत शहा रहमान आणि दुल्हेशाह रहमाननगर मशिदीच्या नायब मुतवली म्हणून काम पाहत असलेल्या शेख शमीम शेख इसाक यांच शहरातील खडकपुरा भागात शनिवारी रात्री उशिरा गोळ्या घालून तसेच धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. ही घटना सकाळी उघडकीस येताच शहरात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली. त्यामध्ये पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी या खून प्रकरणात अनुभवाचा कस लावत तांत्रिक पद्धतीने चौकशी करून अवघ्या चार तासातच मुख्य आरोपीसह मारेकऱ्यांना अटक केली आहे.
या घटनेच्या तपासासंदर्भात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सूचना केल्या होत्या. २०२३ मधील एक केस मागे घेण्याच्या कारणावरून शेख शमीम शेख इसाक यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या घटनेतील आरोपींच्या तपासासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी गुन्हे शाखेतील व इतर पोलीस ठाण्यातील वेगवेगळी १४ पथके तयार केली होती. त्यापैकी चार पथके केवळ सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी आणि इतर दहा पथके आरोपी निष्पन्न करून त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते. आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी एकूण ६२ ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्याचवेळी संशयित हजारो मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या सर्व प्रयत्नामुळे गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी असणारे सर्व आरोपी अनोळखी असूनदेखील अवघ्या काही तासातच पोलिसांना त्यांची नाव आणि ठावठिकाणा शोधून काढण्यात यश आले. एकदा ठावठिकाणा शोधून काढल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवळल्या.
या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हे महादेव पिंपळगाव ता. अर्धापूर शिवारात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी मिर्झा शब्बीर बेग गफार बेग वय ३९, रा. खडकपुरा, ऋषिकेश अनिल घुले वय २३, शंकर गर तरोडा, सय्यद सुफियान सय्यद जमीर वय १९, रा. देगलूर नाका नांदेड, माधव भगवान कांबळे वय २१ रा. राहुल कॉलनी तरोडा बु. नांदेड आणि मुस्ताक अहमद इसाक अहमद वय २१, रा.आसरानगर या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याची सखोल विचारपूस केली असता आरोपीतांनी सदर गुन्हा त्यांच्या साथीदारांसह मिळून केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हा अवघ्या चार तासात उघडकीस आणून मुख्य आरोपी निष्पन्न करणारे अधिकारी आणि अंमलदार यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, वजीराबादचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार, स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, विठ्ठल घोगरे, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, साईनाथ पुयड, मिलिंद सोनकांबळे, उपनिरीक्षक बळीराम दासरे, माधव केंद्रे, सुनील बुलंगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राठोड पोहेकॉ देविदास चव्हाण, पोहेकॉ दिलीप चंचलवार, मिलिंद नरबाग, ज्ञानोबा कवठेकर, उमर शेख, रवी बामणे, गणेश लोसरवार, पोकॉ श्रीराम दासरे, मोतीराम पवार, चाटे, इम्रान शेख, कदम, माने, घोगरे, जोंधळे, पिंगलवाड, गोविंद राठोड, यादव, धम्मानंद जाधव, स्वामी, बिरादार, अजहर, मनोज राठोड, सिद्धार्थ सोनसळे, देवकते, मुंडे सायबर सेल येथील पोहेकॉ दीपक ओढणे, सिटीकर, रेश्मा पठाण, महेश बडगु, हबीब चाऊस, शिवसांब मठपती, विलास कदम, भाऊसाहेब राठोड, संतोष गोखले, संतोष पावडे, ज्वालासिंघ बावरी, राहुल लाटकर, अदनान पठाण आदींनी सहभाग घेतला.
जुन्या वादाचा शेवट अखेर खुनातच..या घटनेतील मुख्य आरोपी मिर्झा शब्बीर बेग याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार आहे. तो त्यांच्या साथीदारांना घेऊन गुन्हे करत असतो. मिर्झा शब्बीर बेग याने नेहमी नायब मुतवली म्हणून काम पाहणाऱ्या शेख शमीम शेख इसाक यांना सातत्याने धमकी देत असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. शेख शमीम हे २०१२ पासून दुल्हेशाह रहमान नगर मशीद येथे नायब मुतवली म्हणून काम करीत होते. सन २२०५ मध्ये मिर्झा बेग आणि शेख हाफिस या दोघांनी बोगस कागदपत्र तयार केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी शेख शमीम यांनी वक्फ बोर्डाकडे तक्रार दिल्याने कोर्टाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच कारणावरून अनेकदा मिर्झा शब्बीर बेग याने शेख इमाम यांच्याशी भांडणही केले होते. २०२३ मध्ये जीवघेणा हल्लाही केला होता. या प्रकरणात वजीराबाद ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. जुने प्रकरण आणि हा गुन्हा मिटवून घेण्यासाठी अनेकदा धमक्याही दिल्या होत्या. अखेर या वादाचा शेवट खुनातच झाल्याचे दिसून आले.



