महापालिका

नांदेडमध्येही होणार बॅनर, होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट..!

अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्स शोधण्याचे क्षेत्रिय अधिकाऱ्यांना आदेश 

नांदेड – मुंबईतील घाटकोपर भागात बॅनर कोसळून १४ जणांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातही बॅनर्स,  होर्डिंग्स स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. आठ दिवसात हे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात येणार आहे. दुसरीकडे अनधिकृत बॅनरचाही शोध घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत.

नांदेड शहरात बॅनर्स, होर्डिंग्स लावण्यासाठी १५१ ठिकाणची परवानगी देण्यात आली आहे. ११ एजन्सीमार्फत शहरामध्ये विविध ठिकाणी जाहिराती लावल्या जातात. घाटकोपर घटनेनंतर या सर्व बॅनर्सच्या जागांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी या संदर्भाने तातडीने संबंधित विभागाला आदेश दिले आहेत. उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी शहरातील बॅनर्स, होर्डिंग्स संदर्भाने माहिती दिली.

शहरात असलेल्या अनधिकृत बॅनरचाही आता शोध घेतला जाणार आहे. याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तीन दिवसात अनधिकृत बॅनरचा सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणातून अनधिकृत बॅनर लावणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेने जाहिरात एजन्सी धारकांनाही एका पत्राद्वारे जाहिरात ठिकाणाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात सूचित केले आहे. यामध्ये परवानगी प्राप्त जाहिरातीचे बॅनर्स आणि होर्डिंग्स योग्य स्थितीत असणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या वादळी वारे, पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास एजन्सी धारकांना जबाबदार धरण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात शहरातील अधिकृत होर्डिंग्स, बॅनर्सच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये नेमके काय आढळते याकडेही आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे अनधिकृत बॅनर काढण्याचेही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. शहरात लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनर्समुळे अनेकदा वादळी वाऱ्यामध्ये विजेच्या तारावर हे बॅनर्स पडले आहेत. यामुळे वीजपुरवठा तासंतास खंडित झाला आहे. याबाबतही महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील १६ नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायतींनाही आपापल्या हद्दीत बॅनर होर्डिंगच्या सुरक्षीततेसंदर्भाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनधिकृत बॅनर असतील तर ते तात्काळ काढून टाकावेत असे आदेशही दिले आहेत. त्याचवेळी उच्च न्यायालयाच्या निर्देशांचेही योग्यप्रकारे पालन व्हावे असेही या आदेशात नमूद केल्याची माहिती नगरपालिका प्रशासन विभागाचे प्रमुख गंगाधर इरलोड यांनी दिली.

राज्य शासनानेही दिल्या महापालिका, नगरपालिकांना सूचना…घाटकोपर येथे १३ मे रोजी होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातानंतर राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांना राज्य शासनाने एका आदेशाद्वारे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होर्डिंग्स, बॅनर याबाबत सुरक्षिततेची प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. शहरात कोणतेही अनधिकृत बॅनर लावू देऊ नये तसेच परवानगी असलेल्या बॅनर, होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!