
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील विधानसभेच्या नऊ जागांसाठी तसेच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भातील सूचना जारी केली असून मंगळवारी ८ ठिकाणी त्या-त्या ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये तर नांदेड उत्तर व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
अधिसूचना जाहीर झाल्यामुळे मंगळवारपासून विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २२ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. निर्धारित केलेल्या ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन भरण्याची प्रक्रिया सुरू राहील. त्यामुळे या काळात तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या प्रक्रियेतील कर्मचारी व उमेदवार व त्यांच्या चार प्रतिनिधींशिवाय अन्य कोणालाही प्रवेश असणार नाही. प्रत्येक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. उमेदवार व त्यांच्या समर्थकांना १०० मीटर अंतरावरून वाहनाशिवाय आतमध्ये प्रवेश करावा लागणार आहे. याशिवाय उमेदवार अधिक चार अशाच लोकांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कक्षामध्ये प्रवेश मिळणार आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी ३० ऑक्टोबरला बुधवारी ११ वा. सुरू होणार आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येईल तर २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबर मतमोजणी होणार आहे.
कुठे स्विकारले जाणार अर्ज…नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षापुढील दालनामध्ये लोकसभेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत अर्ज स्वीकारणार आहेत.
किनवट विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे किनवटच्या निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली (भा.प्र.से.) अर्ज स्वीकारणार आहेत. हदगाव विधानसभा मतदारसंघासाठी तहसीलदार हदगाव यांच्या दालनात हदगावचे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे अर्ज स्वीकारणार आहेत.भोकर विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय कार्यालय भोकर येथे दुसऱ्या माळ्यावरील कार्यालयामध्ये अर्ज दाखल करता येणार आहे. याठिकाणी भोकरचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मंगेशेट्टी अर्ज स्वीकारणार आहेत. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या कॅबिनेट हॉलमध्ये नांदेड उत्तरचे निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार वराडे अर्ज स्वीकारतील. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड येथील बैठक कक्षामध्ये नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ हे अर्ज स्वीकारतील. लोहा मतदारसंघासाठी लोहा येथील तहसिल कार्यालयाच्या महसूल हॉलमध्ये लोह्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार या अर्ज स्वीकारतील. नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी तहसिल कार्यालयातील तहसिलदार यांच्या दालनामध्ये नायगावच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे या अर्ज स्वीकारतील. देगलूर (अ.जा) विधानसभा मतदारसंघासाठी देगलूर तहसिलदार यांच्या बैठक हॉलमध्ये देगलूरच्या निवडणूक निर्णय अधिकारी क्रांती डोंबे या अर्ज स्वीकारतील. मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी तहसिल कार्यालयात मुखेडचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील हे अर्ज स्वीकारतील.
असा आहे निवडणूक कार्यक्रम:
अधिसूचना जाहीर : २२ ऑक्टोबर
नामांकनाची अंतीम तारीख : २९ ऑक्टोबर
नामांकनाची छाननी : ३० ऑक्टोबर
नामांकन मागे घेण्याची अंतीम तारीख : ४ नोव्हेंबर
मतदान तारीख. : २० नोव्हेंबर
मतमोजणी तारीख. : २३ नोव्हेंबर २०२४.