
नांदेड : नागरिकांना महसूल सेवा देण्यासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची अंमलबजावणी अधिक प्रभावी, लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दहा अशासकीय सदस्यांची आज नियुक्ती केली. या संदर्भातील शासन निर्णय महसूल विभागाने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केला आहे.
या सदस्यांवर राज्यस्तरीय समिती सदस्यांशी समन्वय साधणे, शिबिर अभियानाच्या नियोजन व आयोजनाबाबत राज्य समन्वयकांना वेळोवेळी अवगत करणे, तसेच राज्य समन्वयक, समिती सदस्य आणि जिल्हा प्रभारी यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सदस्यांनी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य ते सरपंच यांच्याशी संपर्क साधून या अभियानात त्यांचा सहभाग सुनिश्चित करणे आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी शासनाला आवश्यक सूचना देण्याचे कामही करणे अपेक्षित आहे.
अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या सदस्यांमध्ये संजय कल्लपा कौडगे (नांदेड), अरविंद पाटील निलंगेकर (निलंगा), नितीनकुमार सुरेशचंद्र भुतडा (उमरखेड), संजय गजानन गाते (पुलगाव, वर्धा ), वासुदेव शंकरराव काळे (दौंड), जगदीश तुकाराम मुळीक (वडगाव शेरी / पुणे), प्रकाश कृष्णा निकम (मुखडा, पालघर ), परशुराम प्रभाकर ढेकणे (रत्नागिरी), भानुदास रतन बेरड (सावेडी / अहिल्यानगर) आणि बबनराव रावजी चौधरी (शिरपूर) यांचा समावेश आहे.



