क्राईम

नांदेड पोलीस परिक्षेत्रात अवैध दारू विक्री विरोधातील विशेष मोहीमेत ८ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पाच अप्पर पोलीस अधीक्षक, १६ उपाधीक्षकांसह ७१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह एकाच वेळी कारवाई 

नांदेड – नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात २० ऑक्टोबर रोजी अवैध दारू आणि विक्री विरोधात एकाच वेळी कारवाई करण्यात आली. या ‘मासरेड’मध्ये २२० जणांविरुद्ध २१२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  या मोहिमेत ८ लाख ५८ हजार ७७६ रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विशेष मोहिमेत ५ अप्पर पोलीस अधीक्षक, १६ पोलीस उपाधीक्षक यांच्यासह १६८ अधिकारी आणि सुमारे ५४६ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
नांदेड परिक्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चारही जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. या मोहिमेत अवैध दारू विक्री, अवैध गाळप, मटका, जुगार यासह स्वस्त धान्याचा काळाबाजार करणारे,  वाळू माफियांविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
२० ऑक्टोबर रोजीच्या या विशेष मोहिमेत नांदेड जिल्ह्यात ५७ गुन्हे दाखल करण्यात आले असून  आरोपींची संख्या ५८ आहे. हातभट्टी दारू, दारूचे रसायन, देशी दारू तसेच सिंदी असा एकूण १ लाख ३८ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात ५० पोलीस अधिकारी आणि १६० पोलीस अंमलदार या मोहिमेत सहभागी झाले होते. परभणी जिल्ह्यात ४९ जणांविरुद्ध ४८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. परभणी जिल्ह्यात पोलीस ५३ पोलिस अधिकारी आणि १२६ पोलिस अंमलादर सहभागी झाले होते. हिंगोली जिल्ह्यात २६ जणांविरुद्ध २१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १ लाख ४० हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ३७ पोलीस अधिकारी आणि १२० पोलीस अंमलदार या कारवाईत सहभागी झाले होते. लातूर जिल्ह्यात ८७  जणांविरुद्ध ८६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख ७६ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २८ पोलीस अधिकारी आणि १४० पोलीस अंमलदार मोहिमेत सहभागी झाले होते.
नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि हिंगोलीचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या जिल्ह्यात या कारवाईवर देखरेख करत मोठी कारवाई केली आहे.

नांदेड पोलीस परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात २० ऑक्टोबर या एकाच दिवशी राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत २२० जणांविरुद्ध २१२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ८ लाख ५८ हजार ७७६ रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्रातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध धंद्यांची माहिती संबंधित पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याला द्यावी असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!