प्रशासकीय

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मेघना कावली रुजू 

पहिल्याच दिवशी घेतला विविध योजनांचा आढावा, 'जलजीवन' योजनेतील अर्धवट कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान

नांदेड – नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक मेघना कावली या गुरुवारी सकाळी रुजू झाल्या आहेत. नांदेड जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घेतली. मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी बुधवारी सायंकाळी आपला पदभार सोडला. करणवाल यांची नांदेड जिल्हा परिषदेतून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे.

नांदेड जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षापासून कार्यरत असणाऱ्या मिनल करनवाल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि महिलांच्या सामाजिक व आर्थिक उत्थानासाठी विविध योजना राबविल्या आहेत. बालिका पंचायत हा त्यांचा अभिनव प्रयोग राष्ट्रीय स्तरावर गाजला. त्यांच्या या प्रयोगातून अनेक गावांमध्ये प्रशासकीय व पायाभूत सुविधांना गती मिळाली तसेच किशोर मुलींना पंचायत राज व्यवस्थेचे प्रशिक्षण मिळाले. नुकतीच त्यांनी बालिका पंचायत 2.0 नव्या टप्प्याची सुरुवात केली होती.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी किनवट येथे परिविक्षाधीन कालावधीत सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर एक वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत होत्या. त्यांनी किनवटसारख्या आदिवासीबहुल भागामध्ये शैक्षणिक सुधारणांवर विशेष भर दिला. आदिवासी समुदायाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सुधारणांसाठी विविध योजनांचा अंमल त्यांनी केला आहे.

जिल्ह्यात आता पाणीटंचाई, शैक्षणिक सुधारणा, आरोग्य सेवांचे बळकटीकरण, ग्रामीण भागात शासनाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी यासह ‘जलजीवन’ ची अर्धवट कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्यापुढे राहणार आहे. जलजीवन योजनेच्या अनेक कामांच्या तक्रारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मंत्रालय स्तरापर्यंत केल्या आहेत. जलजीवन योजनेच्या कामामुळे अनेक भागात टँकर सुरू करण्यासही अडचणी येत आहेत. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता मार्चमध्येच वाढली असून अनेक भागात पाणीटंचाईच्या समस्यांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हा पाणी प्रश्न सोडवण्याची पहिली जबाबदारी नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्यावर आली आहे. मेघना कावली यांच्या रूपाने नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी पदावर महिला अधिकाऱ्यांची सलग तिसरी नियुक्ती ठरली आहे. मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्यापूर्वी वर्षा ठाकूर घुगे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज प्रभावीपणे केले होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!