प्रशासकीय

देगलूर येथील ‘त्या’ घटनेनंतर नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने उचलले तातडीने पाऊल…

जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवली शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती,  मुलांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश

नांदेड – देगलूर येथील वन्नाळी फाटा येथे सोमवारी सायंकाळी गॅस भरतांना शालेय मुलांची वाहतूक करणारी जीप जळून खाक झाली होती. सुदैवाने हा प्रकार मुले नसताना घडला होता. या घटनेत जीपसह गॅस भरत असलेल्या ठिकाणचे काही दुकाने, दुचाकीसह एक घरही आगीच्या भक्षस्थानी सापडले होते. या घटनेत जीप चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने एक जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती मागविली आहे.

देगलूरजवळील वन्नाळी फाटा येथे बर्निंग कारचा थरार सोमवारी देगलूरकरांनी अनुभवला. घटनेची माहिती मिळताच तातडीने देगलूर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी धावले. तोपर्यंत जीप जळून खाक झाली होती. इतकेच नव्हे तर दुकाने, दुचाकी आगीच्या ज्वालांनी घेरले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र सदर जीप ही शालेय मुलांची वाहतूक करत असल्याची बाब पुढे आली आहे. एका इंग्रजी शाळेतील मुलांची या जीपद्वारे ने आण केली जात होती. जिल्ह्यात उन्हाचा तडाखा मार्चमध्येच वाढला आहे. परिणामी जिल्हा परिषदेने सर्व माध्यमांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेशही दिले आहेत. या परिस्थितीत शालेय मुलांची ने आण करणाऱ्या वाहनांची परिस्थिती नेमकी काय आहे याकडेही लक्ष वेधणे गरजेचे आहे. वाढत्या उष्णतेमुळे अशा घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. अलीकडील काळात वाहनांमध्ये सीएनजी, गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या ज्वलनशील इंधनाबाबत खबरदारीही घेणे गरजेचे आहे. मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी वाहनधारकांसह शाळांवरही तितकीच आहे.

हीच जबाबदारी ओळखत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने देगलूरच्या घटनेनंतर तातडीने पाऊले उचलत जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना करणाऱ्या वाहनांची माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत मागवली आहे. या माहितीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या वाहनांची संख्या, वाहनांचा प्रकार यामध्ये बस, व्हॅन,जीप यांची माहिती तसेच मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तसेच वाहन चालकांची शाळेत नोंद आहे की नाही, या नोंदणीधारक वाहन तसेच वाहन चालकांची संख्या, शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने, वाहनांच्या सुरक्षा विषयक कागदपत्रांची माहिती शाळेत आहे का? तसेच ज्या वाहनांची नोंद नाही अशा वाहनांची संख्याही जिल्हा परिषदेने तातडीने मागवली आहे. कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीसाठी धोकादायक असलेली वाहने वापरात राहू नयेत, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट आदेश मुख्याध्यापकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून द्यावेत असे निर्देशही दिले आहेत. मुलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी दिले आहेत.

पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचीही मोठी जबाबदारी…शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र तपासणे ही जबाबदारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आहे. पीयुसी, आरसी बुक, बॅच या कागदपत्रासह वाहनाची सुरक्षित अवस्थाही पाहणे गरजेचे झाले आहे. त्याचवेळी वाहनात इंधन म्हणून मोठ्या प्रमाणात सीएनजी, गॅसचा वापर वाढला आहे. वाढत्या उष्णतेमुळे वाहन जागीच पेट घेण्याच्या काही घटना घडल्या आहेत. इतकेच नव्हे तर अवैधरित्या गॅस भरताना देगलूरसारखी गंभीर घटना घडली आहे. या परिस्थितीत खबरदारी गरजेची आहे. त्याचवेळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा वापर इंधन म्हणून केला जात आहे. हे अवैध इंधन भरताना काही ठिकाणी नांदेड जिल्हा पोलिसांनी कारवाई केली आहे. असे असतानाही जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे अवैध इंधन भरणा केंद्र छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा अवैध केंद्रावर धाडसत्र सुरू करणे गरजेचे आहे. त्याचवेळी स्वयंपाकाच्या गॅसचा इंधन म्हणून होणारा वापर थांबवणे ही पोलिसांपुढे मोठी जबाबदारी आहे. या सर्व प्रकारात स्वयंपाकाच्या गॅसचा इंधन म्हणून होणारा वापर थांबवण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग मात्र अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!