
नांदेड – नांदेड महापालिकेची निवडणूक सोमवारी घोषित झाली आहे. निवडणुकीच्या या घोषणेसोबतच आचारसंहितेचीही अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहरात वेगवेगळ्या पक्ष, संघटनांकडून लावण्यात आलेले बॅनर तात्काळ हटविण्यात आले आहेत. दुसरीकडे नांदेड शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेले हत्ती आणि मशाली महापालिका प्रशासनाने पडद्याने झाकून टाकले आहेत. त्यामुळे मनपा निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा पहिला फटका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास बसला आहे.
नांदेड महापालिकेची मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी संपली. त्यानंतर महापालिकेत प्रशासक राज आले. तब्बल तीन वर्षानंतर महापालिकेची निवडणूक १५ डिसेंबर रोजी घोषित झाली आहे. महापालिकेच्या २० प्रभागातून ८१ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ३० डिसेंबरपर्यंत मनपा निवडणुकीत उमेदवारी दाखल करता येणार आहे. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ३ जानेवारी रोजी चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रत्यक्ष रणधुमाळीला प्रारंभ होणार आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होईल तर मतमोजणी १६ जानेवारी रोजी होणार आहे.
निवडणुकीच्या आचारसंहिता अंमलबजावणीत महापालिकेने पहिले पाऊल उचलताना अनाधिकृत बॅनर काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासोबतच महापालिकेनेच केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा सुशोभीकरणाची कामे पडद्याने झाकली आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय पक्ष असलेल्या बहुजन समाज पार्टीचे चिन्ह असलेले पुतळा परिसरातील हत्ती झाकले आहेत. सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चिन्ह असलेल्या पुतळ्याभोवतीच्या सर्वच मोठ्या मशाल पडद्याआड केल्या आहेत.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती लावलेले पडदे हे शिवप्रेमींना मात्र आवडले नाहीत. आचारसंहितेनंतरही अनेक ठिकाणी असलेले राजकीय बॅनर महापालिकेला दिसले नाहीत मात्र छत्रपतींचा पुतळा परिसर पडद्याआड करण्यासाठी महापालिकेला वेळ लागला नाही. महापालिका प्रशासनाने मात्र ही कृती केवळ आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे करावी लागली असल्याचे स्पष्ट केले आहे.



