प्रशासकीय

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजले..!

निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विभागीय आयुक्तांकडून नियुक्त्या, आठ उपजिल्हाधिकारी आणि सात तहसीलदारांवर निवडणुकांची राहणार जबाबदारी 

नांदेड – नांदेड महापालिका निवडणुकांचे पडघम अखेर वाजले आहे. महापालिका निवडणुकीसाठी आठ उपजिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे तर सात तहसीलदारांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी हे आदेश दिले आहेत.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २० प्रभागांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, अविनाश कांबळे, क्रांती डोंबे, स्वाती दाभाडे, विलास नरवटे, प्रवीण मेंगशेट्टी आणि डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे जबाबदारी राहणार आहे. या निवडणुकीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार विकास बिरादार, शंकर लाड, उषा इज्जपवार, धोंडीबा गायकवाड, रेणुकादास देवणीकर, धम्मप्रिया गायकवाड आणि सय्यद उमर सय्यद हुसेन यांची नियुक्ती विभागीय आयुक्तांनी केली आहे.

अंतिम मतदार यादी २० डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार…नांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. नांदेड महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर ३४८ आक्षेप आले आहेत. प्रारूप मतदार यादीत ७ हजार ५८६ संभाव्य दुबार मतदारांची नोंद आहे. महापालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होताच निवडणुकांच्या तारखेची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!