
नांदेड – संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन नांदेड महापालिका वेगवेगळ्या माध्यमातून शहरवासीयांना करत आहे; मात्र प्रत्यक्षात नांदेड महापालिकेच्या मुख्यालयातच पाण्याची नासाडी केली जात असल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला आहे. चक्क गटनेत्यांचे वाहन धुण्यासाठी महापालिकेतील नळाचे पाणी वापरले जात होते. त्यामुळे महापालिकेच्या बाबतीत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’ असाच प्रकार दिसून आला.
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी झाला आहे. परिणामी आगामी काळात मोठ्या जल संकटाचे आव्हान शहरवासीयांपुढे उभे आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर तयारी केली जात आहे. त्यात पाणी बचतीचे आवाहन नांदेड महापालिका वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे. प्रत्यक्षात गुरुवारी सायंकाळी एका गटनेत्याचे वाहन महापालिकेच्या मुख्यालयात चक्क नळाच्या पाण्याने धुतले जात होते. हा प्रकार रोखण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे महापालिकेकडून केले जाणारे पाणी बचतीचे हे आवाहन केवळ नागरिकांसाठीच आहे की काय असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
महापालिकेतील लोकप्रतिनिधीच पाण्याची अशा पद्धतीने नासाडी करत असतील तर याचा शहरवासीयांनी काय आदर्श घ्यावा असाच प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेतील विरोधी पक्षातील एका गटनेत्याचे हे वाहन असल्याची बाब पुढे आली आहे. या गटनेत्यालाही पाण्याचा गैरवापर थांबवावा असे वाटले नाही.



