Police

नांदेड ग्रामीणसह इतवारा पोलीस ठाणे हद्दीत विशेष पोलीस उपमहानिररक्षकांच्या विशेष पथकाने ६८ लाखांचा गुटखा केला जप्त..!

सहा जणाविरुद्ध गुन्हे दाखल, स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू होती अवैध गुटखा विक्री, आता पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे लक्ष..!

नांदेड – नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या अवैध गुटख्यावर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने धाड टाकली आहे. या कारवाईत तब्बल ६८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. इतवारा आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतवारा ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षकांची बदली ऐन गणेशोत्सवात अवैध गुटखा साठ्यावरील कारवाईनंतर करण्यात आली होती. त्यानंतरही इतवारा ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरूच आहे. नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतील कारभारही पोलिसांच्या हाताबाहेर गेला असल्याचेच चित्र आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक आता या दोन ठाणे प्रभारीवर नेमकी कोणती कारवाई करतील याकडेही लक्ष लागले आहे.

विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाला २३ नोव्हेंबर रोजी इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमिर फंक्शन हॉलजवळील एका खोलीत आणि इस्लामपुरा भागातील सेंट्रल ट्रान्सपोर्ट यांच्या गोडाऊनमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा अवैध साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने संबंधित दोन्ही ठिकाणी छापा टाकून ५४ लाख ६ हजार ९५ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणात सय्यद दस्तगीर सय्यद इब्राहिम रा. आस कॉलनी इतवारा, अब्दुल बबलू अब्दुल हमीद रा. मदिनानगर मुदखेड, मोहम्मद आसिफ मोहम्मद हुसेन रा. चुनाभट्टी खुदबई नगर आणि अब्दुल तसलीम अब्दुल मनान सौदागर रा. गुलशन कॉलनी इतवारा यांच्याविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर याच विशेष पथकास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आस कॉलनी येथे मोहम्मद फिरोज शहीद याच्या घरात गुटखा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून १४ लाख १९ हजार ६०० रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात मोहम्मद फिरोज मोहम्मद सईद आणि मोहम्मद फैज मोहम्मद सईद या दोघाविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही प्रकरणात एकूण ६८ लाख २५ हजार ६९५ रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस उप महानिरीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ गणेश राठोड, पोहेकॉ संदीप वाघाडे, गजानन डावरे यांनी केली आहे. विशेष पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.

दरम्यान, नागरिकांना आपल्या भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती थेट पोलिसांना देता यावी या दृष्टिकोनातून पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली खबर नावाची हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनवरून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायाची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवावी असे आवाहन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!