नांदेड जिल्हा

नांदेडमध्ये अवघ्या आठ हजार रुपयांसाठी गेला शेतकरी शंकर क्षीरसागर यांचा बळी..!

दोन लाखांवरील थकीत रक्कम भरल्यानंतर मिळणार होती कर्जमुक्ती, एकरकमी परतफेड योजनेसाठीही ठरले होते पात्र, क्षीरसागर यांनी बँकेकडे तसेच तालुका उपनिबंधक कार्यालयाकडेही केली नव्हती चौकशी

नांदेड – कर्जमुक्ती योजनेच्या तीन याद्याप्रसिद्ध होऊनही आपल्याला कर्जमुक्ती का मिळाली नाही असे म्हणत गळफास घेणाऱ्या बोरगाव येथील शंकर क्षीरसागर यांचा अवघ्या ८ हजार १०४ रुपयांसाठी बळी गेला असल्याची बाब आता उघड झाली आहे. शंकर क्षीरसागर हे एकरकमी परतफेड योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यांना बँकेने तसे कळवलेही होते; मात्र अवघे ८ हजार १०४ रुपये न भरल्यामुळे त्यांना कर्जमाफी मिळाली नाही आणि याच आर्थिक विवंचनेतून क्षीरसागर यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

शंकर क्षीरसागर यांनी सोमवारी दुपारी गळफास घेण्यापूर्वी एक व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट केला. त्यामध्ये त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारत आतापर्यंत तीन कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्या तरीही आपले नाव यादीत का आले नाही असा सवाल उपस्थित केला होता. त्याचवेळी या सर्व प्रकाराची गंभीरपणे चौकशी करावी अशी त्यांनी मागणीही केली होती. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलीचे शैक्षणिक शुल्क कसे भरावे याची चिंता त्यांना लागली होती. याच विषयावर त्यांनी थेट सरकारलाही प्रश्न विचारात मुलींचे शिक्षण मोफत असल्याचा डांगोरा पिटला जात असला तरीही प्रत्यक्षात मुलींचे शिक्षण मोफत नाही असे त्यांनी व्हिडिओद्वारे सांगितले होते. त्यामुळे सरकारलाही आता या विषयावर गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

शेतकरी शंकर क्षीरसागर यांच्या आत्महत्येनंतर नांदेड जिल्हा प्रशासनाने क्षीरसागर यांच्या कर्जाबाबतची माहिती दिली आहे. बोरगाव येथील शेतकरी शंकर अबानराव क्षीरसागर यांनी नांदेड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वजीराबाद शाखेतून २६ सप्टेंबर २०२३ रोजी १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्याने ते थकीत झाले. दिनांक ३१ मार्च २०२६ अखेर त्यांच्या कर्ज खात्यावर २ लाख ८ हजार १०४ रुपये थकबाकी होती.

शंकर क्षीरसागर या कर्जदाराची माहिती बँकेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या पोर्टलवर अपलोड केली आहे. सदर कर्ज एकरकमी परतफेड योजनेसाठी पात्र असल्याचे बँकेने कळविले होते. एकरकमी परतफेड योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांनी २ लाख रुपयावरील थकीत रक्कम भरल्यानंतर त्यांना नियमानुसार २ लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार शंकर क्षीरसागर यांनी त्यांच्याकडे असलेल्या २ लाख ८ हजार १०४ रुपये थकबाकी पैकी केवळ ८ हजार १०४ रुपये थकबाकी भरली असती तर त्यांना २ लाख रुपये कर्जमाफी मिळाली असती. त्यामुळे दुर्दैवाने केवळ ८ हजार १०४ रुपयांसाठी क्षीरसागर यांनी गळफास घेतला असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्याचवेळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या खुलाशानुसार शंकर क्षीरसागर यांनी कर्जमुक्तीच्या कर्जमुक्ती योजनेच्या यादीत नाव न आल्याबाबत तालुका उपनिबंधक कार्यालयाकडे चौकशी अथवा तक्रार केल्याचे निदर्शनास आले नसल्याचे सांगितले आहे. क्षीरसागर यांनी कर्जमुक्ती योजनेबाबत बँकेशीही संपर्क साधला नसल्याचे महाराष्ट्र बँक ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे. त्यामुळे अवघ्या ८ हजार १०४ रुपयांसाठी क्षीरसागर यांनी गळफास घेतला असेच म्हणावे लागेल.

दरम्यान, कर्जमुक्ती योजनेबाबत काही शंका अथवा तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित बँक तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती तहसीलदार किंवा सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. पात्र शेतकऱ्यांना योजनेच्या निकषानुसार योग्य तो लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या यादीत नाव अद्याप आलेले नसल्यास शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि कोणताही अनुचित निर्णय घेऊ नये असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शाहूराज हिरे यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत तीन याद्यांमध्ये जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ९१२ शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी १ लाख ४१ हजार ८३५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १ लाख २ हजार २१८ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ८६१ कोटी ५६ लाख रुपये कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

शेतकरी कर्जमाफी यादीत नाव समाविष्ट न झालेल्या किंवा योजनेच्या लाभाबाबत शंका असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बँकेची संपर्क साधावा तसेच तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे किंवा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे तक्रार करावी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तक्रार निवारण समित्याकडे आतापर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा एकूण १ हजार ८४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १ हजार ६६६ तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचेही सांगितले आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांच्या कार्यालयात कर्जमाफी योजनेसाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष आहे. ए.डी. भागानगरे हे या कक्षाचे नोडल अधिकारी आहेत शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेची संबंधित तक्रारी किंवा शंकांसाठी ९२८४३५०७३१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!