
नांदेड – जिल्ह्यात आगामी काळात सण उत्सवांच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या अनुषंगाने तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे नूतन उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. सण उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये, याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
नूतन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्राचा पदभार २५ जुलै रोजी स्वीकारला. त्यानंतर आज ३० जुलै रोजी त्यांनी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात पहिली क्राईम बैठक घेतली. प्रारंभी उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. पहिल्या क्राईम मीटिंगमध्ये उमाप यांनी जिल्ह्यातील गंभीर गुन्हे, प्रलंबित गुन्हे, रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची विस्तृतपणे माहिती घेतली. संघटित गुन्हेगारी नियंत्रणासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईबाबत या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी माहिती दिली.
नांदेड जिल्ह्यात आपण यापूर्वी काम केलेले असल्यामुळे जिल्हावासियांना मोठ्या अपेक्षा आहेत. नांदेडकरांच्या या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे असल्याचेही उमाप यांनी यावेळी सांगितले.
आगामी काळातील निवडणूक बंदोबस्ताच्या तयारीचाही आढावा… आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रशासकीय तयारीला प्रारंभ झाला आहे. या निवडणुका शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी बंदोबस्ताचा आराखडा तयार करण्याच्या सूचना उमाप यांनी दिल्या. विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी संपूर्ण जिल्हाभरात राहणार आहे. त्यामुळे पोलीस, अधिकारी कर्मचाऱ्यावर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडताना कोणतीही हयगय तसेच निष्काळजीपणा होऊ नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच बंदोबस्ताचा योग्य आराखडा तयार करावा, त्याची अंमलबजावणी करावी असेही सूचित केले.