
नांदेड – किनवट पाठोपाठ आता माहूर तालुक्यातही वाघाचे जनावरांवरील हल्ले वाढत असल्याने शेतकरी भयभयीत झाले आहेत. शनिवारी दुपारी माहूर तालुक्यातील रुई शिवारात वाघाने एका गायीवर हल्ला केल्याची घटना घडली. प्रेम भालेराव यांच्या मालकीच्या गायीवर वाघाने हल्ला केला असताना परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शेतकऱ्यांचा आरडाओरडा ऐकून वाघाने पळ काढला.
शनिवारी प्रेम भालेराव यांनी आपली पाळीव जनावरे चरण्यासाठी रुई शिवारात सोडली होती. दुपारी त्यांच्या गाईवर वाघाने हल्ला केला. गाईच्या आवाजाने हल्ल्याची ही बाब शिवारात शेतीची कामे करीत असलेल्या निरंजन सुर्वे, मंगेश शेळके, पवन ईसाई, रमेश शेळके आणि बालाजी तळणकर यांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच आवाजाच्या दिशेने धाव घेतली. आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे वाघाने गाईला सोडले. शिवारात असलेल्या शेतकऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे वाघाच्या हल्ल्यातून गायीला वाचवण्यात यश आले. या सर्व शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.
या घटनेमुळे रुई शिवारातील शेतकरी व नागरिकांमध्ये वाघाच्या वावराबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने परिसरात गस्त वाढवून वाघाचा बंदोबस्त करावा तसेच शेतकरी व पशुधनाच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी सुरेखा बालाजी तळणकर यांनी केली आहे. किनवट तालुक्यातही चिखली तांडा परिसरातही १८ नोव्हेंबर रोजी वाघाने एका गोऱ्ह्याचा फडशा पाडला होता. त्यामुळे किनवट आणि माहूर तालुक्यातील शेतकरी वाघाच्या या मुक्त वावर सुरू असल्याने भयभयीत झाले आहेत.



