महापालिका

नांदेडमध्ये पुरात अडकलेल्या २३ श्वानांच्या बचावासाठी महापालिका अग्निशमन दल सरसावले

दोन दिवसांपासून पुरात अडकलेल्या श्वानांची केली सुटका, श्वानांच्या बचावकार्यानंतर स्थानिक नागरिकांसह बघ्यांनी केले महापालिका अग्निशमन दलाचे कौतुक

नांदेड – शहराला गोदावरी नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक भागात बॅक वॉटरचे पाणी शिरले आहे. मंगळवारी रात्रीपासून अनेक कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी घालवण्यात आले आहे. मात्र अशाच पुराच्या पाण्यात अडकलेल्या २३ श्वानांची सुटका महापालिकेच्या अग्निशमन दलाने केली आहे. या श्वानांच्या बचावादरम्यान एक श्वान बुडत असताना अग्निशमन दलाच्या जवानाने पाण्यात उडी घेत त्या बुडणाऱ्या श्वानाला जीवनदान दिले. महापालिकेने केलेल्या या मुक्या प्राण्यांच्या बचाव कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नवीन नांदेडातील वसरणी भागात असलेल्या पंचवटी नगराला गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचा नेहमीच फटका बसत आहे. मंगळवारी या भागात दुपारपासूनच पाणी वाढत होते. त्यामुळे अनेक कुटुंबीयांनी आपले घर रिकामे करून सुरक्षित स्थळी आसरा घेतला. मात्र या सर्व काळात अनिकेत गादेवार यांच्या श्वान फार्मिंगमध्ये जवळपास २३ श्वान होते. हे श्वान पहिल्या मजल्यावर होते. पुराचे पाणी तिथपर्यंत जाणार नाही अशी गादेवार यांना अपेक्षा होती; मात्र दुसऱ्या दिवशी आज बुधवारी पुराचे पाणी पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचले. ही बाब गादेवार यांना समजताच त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलास कळवली.

माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे, उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, शिवाजी शिंदे, पेरेवार, कदम, ताटे हे तेथे एका इंजिन बोटीसह पोहोचले. जवळपास १३ ते १५ फूट पाण्यात बोट नेण्यात आली. अनिकेत गादेवार यांच्या मदतीने अग्निशमन दलाने सर्व श्वान बोटीद्वारे पुराबाहेर काढले आणि सुरक्षित स्थळी हलवले. २३ श्वानांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बोटीच्या चार फेऱ्या कराव्या लागल्या. शेवटच्या फेरी दरम्यान एक श्वान अचानकपणे पाण्यात बुडत असल्याचे दिसून आले. त्यावेळी एका क्षणाचाही विचार न करता अग्निशमन दलाचे जवान शिवाजी शिंदे यांनी पाण्यात उडी मारली आणि त्या श्वानाला पाण्याबाहेर काढले. काही क्षणाचाही विलंब त्या श्वानाचा जीव जाण्यास पुरेसा होता. मात्र शिवाजी शिंदे यांनी दाखवलेली तत्परता अतिशय महत्त्वाची ठरली.

महापालिकेने केलेल्या या बचाव कार्याबद्दल अनिकेत गादेवार यांना महापालिकेचे कोणत्या शब्दात आभार मानावे हेच कळत नव्हते. त्यावेळी महापालिकेचे अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे आणि उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे यांनी आमचे ते कामच असल्याचे सांगून त्यांना दिलासा दिला. २३ श्वानांचे हे बचावकार्य सुरू असताना मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. श्वानांची सुटका होताच स्थानिक नागरिक आणि उपस्थितांनी महापालिका अग्निशमन दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले.

Related Articles

One Comment

  1. पुराच्या पाण्यातुन माणसांनाच काढतांना फार मोठी कसरत करावी लागते.. हे तर मुके प्राणी यांना अशा प्रकारे पुरातुन प्राण्यांना फारच शर्तीचे प्रयत्न करुन काढलेले आहे.. त्याबद्दल मनपा अग्निशमन दल आपत्ती प्रतिसाद दलाच्या सर्व अधिकार कर्मचारी यांचे कोतुकास्पद काम आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!