क्राईम

नांदेड जिल्ह्यात बोगस कामगार नोंदणी पाठोपाठ बोगस  प्रमाणपत्रांच्या आधारे घेतला योजनांचा लाभ

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय अंतर्गत उघडकीस आलेला प्रकार, चौघाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नांदेड – बोगस कामगार नोंदणी पाठोपाठ आता सहायक कामगार आयुक्त कार्यालयांतर्गत बोगस प्रमाणपत्रांचेही सादरीकरण करून वेगवेगळे लाभ उचलण्याचे प्रकार नांदेड जिल्ह्यात पुढे आले आहेत. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आणि वैद्यकीय मदत घेण्यासाठी बोगस कागदपत्र सादर करून योजनांचा लाभ घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस कामगारांची नोंदणी झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. विभागीय पथकाकडूनही या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात आली होती. उमरी तालुक्यात बोगस कामगार नोंदणी प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या विभागीय पथकाचा अहवाल नेमका काय आला ही बाब गुलदस्त्यात असतानाच नांदेड जिल्ह्यात आता बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारी शिष्यवृत्ती तसेच वैद्यकीय मदत घेण्यासाठी बनावट कागदपत्र सादर करून लाखो रुपयांचा लाभ घेतल्याची बाब पुढे आली आहे.

नांदेड येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कामगार अधिकारी यास्मिन अब्दुल गनी शेख यांनी तक्रार दिली आहे. राज्याच्या कामगार विभागाकडून कामगारांसाठी अनेक योजना कार्यरत आहेत. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना काही अटी आणि निकष शासनाने घालून दिले आहेत. कामगारांना योजनेच्या माध्यमातून गृहपयोगी वस्तूंचा संच, बांधकाम कामगारांच्या पाल्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि वैद्यकीय मदत तसेच स्वतःच्या लग्नासाठी आर्थिक मदत आणि इतर समाजोपयोगी योजना पुरविण्यात येतात. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगार असल्याचे आणि एका आर्थिक वर्षात एकूण ९० दिवस काम केल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमाणपत्र तसेच नोंदणीकृत कंत्राटदाराचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

कामगार अधिकारी यास्मिन अब्दुल गनी शेख यांनी २०२४- २५ मधील कामगारांनी सादर केलेल्या त्यांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्ती अर्जांची पडताळणी केली. त्या पडताळणीत ९ मे २०२५, २७ जून २०२५, २८ जून २०२५ आणि २३ जुलै २०२५ रोजी लेखी पत्राद्वारे संबंधित अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांनी सादर केलेली चार बोनाफाईड प्रमाणपत्र ही बनावट आणि खोटी असल्याचे आढळून आले आहे. ही बनावट प्रमाणपत्र प्रभू नारायण उरडवार रा. पिंपरण पो. कावलगाव ता. पूर्णा जि. परभणी यांनी त्यांचे पाल्य स्नेहा प्रभू उरडवार आणि करण प्रभू उरडवाड या दोघांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच ग्रामसेवकाचे स्वतः ९० दिवसाचे प्रमाणपत्र लावून पेटी, अत्यावश्यक संच आणि सुरक्षा किट ज्याची किंमत ९४ हजार ४७ रुपये इतकी आहे. या सर्व वस्तूंचा बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेऊन शासनाची शासनाची फसवणूक केली. असाच प्रकार राधाबाई किशनराव घुसे रा. सिद्धनाथ पुरी चौफाळा नांदेड यांनीही त्यांचे पाल्य रोहित किशनराव घुसे याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक बोनाफाईड बनावट सादर केले. महापालिकेचे स्वतःचे ९० दिवसाचे प्रमाणपत्र लावून पेटी अत्यावश्यक संच आणि सुरक्षा किट किंमत असा ९ हजार २४० रुपये योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली. पुष्पा विजय झुजारे रा. सिद्धार्थ नगर बाळापुर ता. धर्माबाद यांनीही माधव विजय झुजारे यांच्या नावे वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक बोनाफाईड बनावट प्रमाणपत्र सादर केले. महानगरपालिकेचे स्वतःचे ९० दिवसाचे प्रमाणपत्र लावून ९ हजार २४० रुपयांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली. हदगाव तालुक्यातील लोहा येथील गंगाबाई दिगंबर कासरे यांनीही त्यांच्या पाल्याचे स्वाती दिगंबर कासरे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक बोनाफाईड बनावट प्रमाणपत्र तसेच ग्रामसेवकाचे ९० दिवसाचे प्रमाणपत्र लावून पेटी अत्यावश्यक संच सुविधा, सुरक्षा किट किंमत १ लाख १७ हजार ६४७ रुपयांच्या योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली.

या चौघांनी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र आणि पाल्यांचे शैक्षणिक बोनाफाईड बनावट तयार करून शासनाची फसवणूक केली. यात शासनाचे २ लाख ३० हजार १७४ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी चौघाविरुद्ध तक्रार देण्यात आली. त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थडवे यांच्याकडे देण्यात आला आहे

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!