
नांदेड – जिल्ह्यातील अवैध व्यवसाय पूर्णतः बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऑपरेशन फ्लश आउट हाती घेण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी करण्यात आलेल्या कारवाईत ७२ जणांविरुद्ध ६४ गुन्हे दाखल करून ८ लाख २९ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान एका किराणा दुकानात देशी दारूची विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या दुकानदाराविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्या विरुद्ध, अवैध जुगार खेळणाऱ्या विरुद्ध आणि अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यावर छापा मारून कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात देशी दारू, हातभट्टी दारूची विक्री वेगवेगळ्या ठिकाणी लपून-छपून केली जाते. त्याचवेळी आता एका किराणा दुकानात पोलिसांनी छापा मारून देशी दारूची विक्री होत असल्याचे उघड केले आहे. जिल्ह्यात सीमावर्ती भागासह अनेक ठिकाणी क्लबच्या नावाखाली जुगार अड्डे सुरू आहेत. या जुगारांना फाईव्ह स्टार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यासह परराज्यातील जुगारीही नांदेडमध्ये जुगार खेळण्यासाठी येत आहेत. यात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. स्थानिक पोलिसांना या बाबी माहीत नसाव्यात हे मात्र एक आश्चर्यच आहे. जिल्हाभरात अवैध रेती उपसा आता अतिशय जोमाने होत असल्याचे चित्र आहे. जुगार अड्डे, वाळू माफीयाविरुद्ध धाडी नेमक्या कुठे, कोणत्या ठाणे हद्दीत करण्यात आल्या याचा मात्र स्पष्ट उल्लेख पोलिसांनी दिलेल्या प्रेस नोटमध्ये नाही.
शनिवारी केलेल्या मासरेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस अधिकारी व सर्व पोलीस अंमलदार, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि अंमलदारांच्या सहभागातून करण्यात आली



