प्रशासकीय

नांदेडच्या महापौरांना विमानतळावर पोलिसांनी अडवले, आ. कल्याणकरांनी आत सोडले..!

पहिल्यांदाच विमानतळावर गेलेल्या महापौर कविता मुळे यांना पोलिसांच्या आडमुठेपणाचा बसला फटका, हेलिकॉप्टर थांबवून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी साधला महापौरांशी संवाद 

नांदेड – नांदेड महापालिकेवरील प्रशासकीय राजवटीनंतर जवळपास सव्वा तीन वर्षानंतर नांदेडच्या महापौर पदाची निवड झाली. नांदेडमध्ये पहिल्यांदाच भाजपच्या महापौर सत्तेत विराजमान झाल्या. केंद्रात, राज्यात आणि नांदेडमध्येही भाजपची सत्ता असताना नांदेडच्या महापौरांना विमानतळावर पोलिसांनी अडवल्याचा प्रकार पुढे आला आहे. विशेष म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी त्या विमानतळावर जात होत्या. याच कालावधीत विमानतळावर शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचेही आगमन झाले. त्यांनी महापौर कविता मुळे यांना सोबत घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घडवून आणली.

नांदेडमध्ये आज शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेडमार्गे अनुक्रमे परळी आणि पोहरादेवी येथे रवाना झाले. नांदेड विमानतळावर पोहचल्यावर त्यांचे स्वागत करण्यासाठी नांदेडच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर कविता मुळे या पहिल्यांदाच विमानतळावर पोहोचल्या. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी अधिकाऱ्यांसह इतर राजकीय मंडळीही उपस्थित होते. यानंतर पुन्हा परळीहून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून महापौर कविता मुळे विमानतळाबाहेर पडल्या; पण त्याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळावर आगमन झाल्याची माहिती त्यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्या विमानतळाबाहेरून पुन्हा आत जाण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ आल्या. त्यावेळी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना आत सोडण्यास नकार दिला. नांदेडच्या महापौर असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांना आत प्रवेश दिला नाही. बंदोबस्तावरील पोलिसांनी प्रवेशासाठी पास आवश्यक असल्याचे सांगितले. पोलिसांच्या या हेकेखोरपणामुळे महापौर या तेथून परतल्या. दरम्यान, याचवेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हेही विमानतळावर पोहोचले. त्यांनी विचारणा केली असता महापौरांना अडविण्याचा प्रकार पुढे आला. त्यांनी स्वतः महापौर कविता मुळे आणि संतोष मुळे यांना पुन्हा विमानतळावर नेले. दुसरीकडे नांदेड महापालिकेचे सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे यांना मात्र बाहेरच ताटकळत थांबावे लागले.

या सर्व कालावधीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईहून आलेल्या विमानातून उतरून पोहरादेवीला जाण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. हेलिकॉप्टरचा दरवाजा लावत असतानाच त्यांना नांदेडच्या महापौर कविता मुळे या भेटण्यासाठी आल्याची माहिती मिळताच त्यांनी हेलिकॉप्टर थांबविले आणि हेलिकॉप्टरमधूनच मुळे आणि आमदार कल्याणकर यांच्याशी संवाद साधून ते पुढे पोहरादेवीकडे निघाले.

नांदेड महापालिकेच्या निवडणुका जवळपास सव्वा तीन वर्ष झाल्या नव्हत्या. या कालावधीत नांदेडमध्ये येणाऱ्या व्हीआयपी चे स्वागत हे आमदार आणि अधिकाऱ्यांकडून केले जात होते. नांदेडमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्हीआयपीचे स्वागत नांदेडच्या प्रथम नागरिक, महापौरांनी करावे असा प्रोटोकॉल आहे. याच प्रोटोकॉलचे पालन करीत महापौर कविता मुळे या नांदेड विमानतळावर पोहोचल्या खऱ्या; मात्र त्यांना पहिल्याच दिवशी पोलिसांच्या आडमुठ्या धोरणाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या काळात अनेक महापौरांनी भाजपासह महायुतीच्या नेत्यांचे स्वागत करण्याचे टाळले होते. आता सत्ता परिवर्तनानंतर नांदेड महापालिकेत भाजपाच्या महापौर विराजमान झाल्या आहेत. त्या प्रोटोकॉलप्रमाणे व्हीआयपीच्या स्वागतासाठी विमानतळावर अनेक वर्षानंतर पोहोचल्या आहेत. त्यामुळे कदाचित पोलीस प्रोटोकॉल विसरले असतील, ही बाबही प्रामुख्याने नमूद करावी लागेल. या विषयात नांदेडचे पोलीस अधीक्षक आता निश्चितच लक्ष घालतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!