
नांदेड – शहरातील गोवर्धन घाट रस्त्यावर रविवारी दुपारी एका १७ वर्षीय तरुणाला जुन्या भांडणातून दोघा जणांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत उपचारादरम्यान त्याचा एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांचा शोध घेतला जात आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेने नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गोवर्धन घाट भागातील राहणाऱ्या कमलप्रीत सिंघ या १७ वर्षीय युवकाचा त्याच्या मित्रासोबत आठ दहा दिवसापूर्वी वाद झाला होता. या वादातून कमलप्रीतसिंघने त्याला मारहाणही केल्याची माहिती पुढे आली आहे. हाच राग मनात ठेवून आज रविवारी दुपारी ४:३० च्या सुमारास कमलप्रीत सिंघ याला दोघा जणांनी गोवर्धन घाट पुलाजवळ गाठले आणि त्याच्यावर चाकुने जबर हल्ला केला. या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कमलप्रीतसिंघला कौठा भागातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या पोटावर चाकूचे वार करण्यात आले होते. गंभीर अवस्थेत असलेल्या कमलप्रीतसिंघचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेचा वजिराबाद पोलिसांनी तपास सुरू केला आहे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. भर दिवसा घडलेल्या या चाकू हल्ल्याच्या घटनेने गोवर्धन घाट भागात काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. वजीराबाद गुन्हे शोध पथकासह नांदेड पोलीस आरोपीच्या मागावर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.



