नांदेड : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून ज्यांना घरकुल मिळाले आहेत अशा लाभार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने मोफत रेतीसाठा उपलब्ध केला आहे. शासन निर्णयानुसार सेतू केंद्रात अर्ज करून घरकुल लाभार्थी हा मोफत रेतीसाठा घरासाठी मिळवू शकणार आहे.
शासन निर्णयानुसार जिल्ह्यात घरकुलाच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात ३ हजार ६६२ लाभार्थ्यांसाठी एकूण १७ हजार ३७२ ब्रास रेतीसाठा वितरित करण्यात आला आहे. अशा विनामूल्य वाळू उपलब्ध करुन दिलेल्या घरकुलाच्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने www.nanded.nic.in या वेबसाईटवर जाहीर केली आहे.
घरकुलाच्या विविध योजनातून ज्यांना शासकीय घर मंजूर करण्यात आले आहे. अशा मंजूर घरकुल लाभार्थीची माहिती महाखनिज प्रणाली या वेबसाईटवर नोंदविण्यात आली आहे. या यादीमध्ये नोंद असलेल्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या १९ एप्रिल २०२३ व १६ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयान्वये बांधकाम करण्यास मोफत रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाने वाळु डेपोमध्ये वाळु डेपोनिहाय रेतीसाठा आरक्षित केला आहे. याची माहिती सुध्दा www.nanded.nic.in या वेबसाईटवर जाहीर केली आहे. जिल्ह्यामध्ये आता घरकुल लाभार्थ्यांसाठी एकूण १८ हजार ६३३ ब्रास रेती आरक्षित करण्यात आली आहे. यामध्ये देगलूर उपविभागात देगलूर तालुक्यात शेवाळा येथे ४४४ ब्रास, तमलूर येथे ३३० तर शेखापूर येथे ३९३ ब्रास रेतीसाठा उपलब्ध आहे. बिलोली उपविभागात येसगी १ हजार ९९९ ब्रास, नागणी ४८९, सगरोळी – १ येथे १ हजार ८३९, सगरोळी -२ येथे ४ हजार ८९१ तर हुनगुंदा १ हजार २६०, गंजगाव ६३०, बोळेगाव २४ ब्रास साठा राखीव आहे. उपविभाग हदगाव बेलमंडल या डेपोमध्ये ४९२, उपविभाग किनवट माहूर तालुक्यामध्ये केरोळी ८३९, कोळी बे. ६४५ तर धर्माबाद उपविभागात बळेगाव ६९३ रेतीसाठा उपलब्ध आहे.कंधार उपविभागात येळी १२६, बेटसावंगी १ हजार २९२ साठा उपलब्ध आहे. नांदेड उपविभागात खुपसरवाडी १ हजार ४८२, भायेगाव १७२, वाघी ५८५ ब्रास रेतीसाठा आरक्षित आहे.
अत्यंत सोप्या पद्धतीने ही रेती लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यासाठी फक्त वाळूची आवश्यकता असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांनी नजीकच्या सेतू केंद्रात जाऊन संपर्क करावा. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून विनामूल्य वाळू उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.