महापालिका

नांदेडमध्ये नूतन महापौरांनी रस्त्यावर उतरून घेतला स्वच्छतेचा आढावा..!

भल्या पहाटेच रेल्वे स्टेशन परिसर, बस स्टँड परिसराची केली पाहणी, स्वच्छतेत हलगर्जीपणा केल्यास दंडात्मक कारवाईचा दिला इशारा

नांदेड : नवनिर्वाचित महापौर कविता संतोष मुळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला आहे. शनिवारी संपूर्ण शहर साखर झोपेत असताना त्यांनी शहराच्या विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्यास दंडात्मक कारवाई करावी असे स्पष्ट आदेश महापौर कविता मुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महापौर कविता मुळे यांनी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि अंतर्गत गल्ल्यांमधील स्वच्छतेची पाहणी केली. महापौरांनी प्रामुख्याने राज कॉर्नर, चैतन्य नगर एअरपोर्ट रोड, नमस्कार चौक, रेल्वे स्टेशन परिसर, बस स्टँड परिसर या भागात स्वच्छतेच्या कामाची पाहणी करून सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना स्वच्छतेच्या कामासंदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या. त्यांनी एअरपोर्ट रोडवरील उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या समस्यासुद्धा जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे कचरा संकलन करणाऱ्या ‘घंटागाडी’च्या वेळेबाबत आणि नियमिततेबाबत नागरिकांशी संवाद साधला.

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ प्रशासन नव्हे, तर नागरिकांनीही कचरा रस्त्यावर न टाकता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे. याप्रसंगी महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक, स्वच्छता अधिकारी बालाजी देसाई, स्वच्छता निरीक्षक किशन, तारू प्रियंका एंगडे आणि संबंधित कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेतही महापौरांनी यावेळी दिले आहेत.

इंदौरच्या धर्तीवर नांदेडमध्ये स्वच्छतेचा प्रयोग…यावेळी महापौर कविता मुळे म्हणाल्या, इंदौरच्या धर्तीवर नांदेड शहरात स्वच्छतेचा उपक्रम राबविणार असून स्वच्छ, सुंदर शहर व्हावे तसेच शिक्षण, आरोग्य, शुद्ध पाणीपुरवठा या बाबींना प्राधान्य देणार आहोत. कचरा डेपोत कचऱ्यावरील प्रक्रिया आणि सांडपाणी व्यवस्थापनात सुधारणा करण्याचे आदेशही महापौरांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. स्वच्छ व सुंदर नांदेड: “स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित नांदेड” हे आपले मुख्य ध्येय असून, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी या पाहणीदरम्यान स्पष्ट केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!