
नांदेड – नांदेड पोलीस परिक्षेत्रात सर्वाधिक १९९ शिपाई पदांसाठी नांदेडमध्ये ११ फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने होत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ‘नांदेड स्क्रिप्ट’शी बोलताना दिली. ही भरती प्रक्रिया पहाटे चार वाजेपासून सुरू होत आहे. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत संपूर्ण शारीरिक चाचण्या पार पाडल्या जात आहेत.
जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू आहे. १९९ पदांसाठी १४ हजार ६८२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरती प्रक्रियेत पहिला दिवस वगळता दर दिवशी १ हजार ३५० उमेदवारांना बोलवण्यात येत आहे. अगदी पहाटे चार वाजेपासून या भरती प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. उन्हाचा तडाखा या उमेदवारांना बसू नये, यासाठी ही खबरदारी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात होत असलेल्या शारीरिक चाचणीत उमेदवारांची उंची आणि छाती मोजणी, १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे आणि गोळा फेक या चाचण्या घेतल्या जात आहेत. शारीरिक चाचणीसाठी ५० गुण राहणार आहेत.
भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संपूर्ण शारीरिक चाचणी आरएफआयडी तंत्रज्ञान, बायोमेट्रिक, ऑटो फोटो कॅप्चर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे शारीरिक चाचणी दरम्यान प्रत्येक प्रकारात उमेदवारांना मिळालेले गुण तात्काळ सांगितले जात आहेत. गुणांची खात्री झाल्यानंतर उमेदवारांच्या सहमतीसाठी त्यांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या जात आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रथमच अत्याधुनिक अशा आरएफआयडी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमेदवारांची धावण्याची वेळ नोंदवली जात आहे. या भरती प्रक्रियेत किमान मानवी हस्तक्षेप असावा यासाठी अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले. शारीरिक चाचणीनंतर उमेदवारांना गुण तात्काळ कळत आहेत. त्याचवेळी जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावरही गुणांची यादी दर दिवशी टाकली जात आहे. जिल्हा पोलीस दलाच्या नोटीस बोर्डावर ही यादी उमेदवारांसाठी लावण्यात येत आहे.
भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांसाठी आरोग्याची काळजी ही नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेतली जात आहे येथे स्वतंत्र वैद्यकीय पथक उपलब्ध आहे. बीड सारखा अप्रिय प्रकार होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी पाणी, केळी त्याचवेळी खिचडीची व्यवस्थाही नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अर्चना पाटील, पोलीस उपाधीक्षक (गृह) अश्विनी जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्यासह पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, राखीव पोलीस निरीक्षक विजय धोंडगे, साठ पोलीस अधिकारी तसेच २५० हून अधिक पोलीस अंमलदार प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत.
सामाजिक संस्था आणि राजकीय मंडळीची उदासीनता … संपूर्ण राज्यात पोलीस भरती प्रक्रिया एकाच वेळी सुरू आहे. या पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून उमेदवार येत आहेत. या पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी नांदेड जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या हिंगोली, परभणी या जिल्ह्यात सामाजिक संस्था आणि राजकीय नेते मंडळीकडून राहण्याची तसेच जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी तर परभणीत विठ्ठल कांगणे यांनी ही व्यवस्था केली आहे. नांदेड शहरात शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. त्यांच्यासह नांदेडमध्ये एकही सामाजिक संस्था अथवा राजकीय नेतेमंडळी या पोलीस भरतीसाठी आलेल्या युवकांच्या मदतीसाठी पुढे सरसावली नाही. भरतीसाठी उमेदवारांना पहाटे चार वाजेपासूनच मैदानावर बोलावण्यात आले आहे. अशा परिस्थितीत बाहेरगाहून येणाऱ्या उमेदवारांसाठी स्थानिकांकडून मदत मिळणे अपेक्षित आहे; मात्र ही अपेक्षा नांदेडमध्ये फोल ठरली आहे. सामाजिक संस्था आणि राजकीय नेते मंडळाची युवकाप्रतींची उदासीनता स्पष्ट होत आहे.



