प्रशासकीय

बिलोली नगर परिषदेची सुधारित आरक्षण सोडत जाहीर 

दहा प्रभागांसाठी आज रविवारी पुन्हा एकदा झाली सोडत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले होते फेर आरक्षण सोडतीचे आदेश 

नांदेड – बिलोली नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुधारित आरक्षण सोडत आज रविवारी झाली. १० प्रभागातील २० नगरसेवकांसाठी आरक्षण घोषित करण्यात आल्याची माहिती बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिली.

बिलोली नगर परिषदेच्या सुधारित आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक एकमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग तीनमध्ये अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण, प्रभाग चारमध्ये अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक पाचमध्ये अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग सहामध्ये अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक सातमध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण तर प्रभाग क्रमांक आठमध्ये अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक नऊमध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण तर प्रभाग क्रमांक दहामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातील उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.

बिलोली आणि कुंडलवाडी नगर परिषदेच्या प्रभाग निहाय आरक्षण निश्चित करताना ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांची पुन्हा सोडत करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दोन्ही नगरपालिकांच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांची सोडत पुन्हा काढण्याचे आदेश दिले होते. बिलोली आणि कुंडलवाडी नगरपालिकेत महिला आरक्षणाच्या यापूर्वीच्या सोडतीत कुंडलवाडीत दोन प्रभागात आणि बिलोलीच्या एका प्रभागातील दोन्ही जागा महिलेला सुटल्या होत्या तसेच कुंडलवाडीतील एका प्रभागात महिलेला एकही जागा दिली नाही, त्यामुळे नियमावलीचे उल्लंघन झाल्याची बाब पुढे आली. नगरपालिकेत द्विसदस्य प्रभाग असल्याने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण असल्यामुळे प्रत्येक प्रभागात महिलांसाठी एक जागा राखून ठेवणे आवश्यक होते; परंतु कुंडलवाडीतील आणि बिलोलीच्या एका प्रभागात महिलांच्या आरक्षणामध्ये असमानता झाली होती. आरक्षण सोडतीदरम्यान उपस्थित नागरिकांनी आक्षेपही घेतले; परंतु त्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करण्यात आले.

याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर कर्डिले यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत मार्गदर्शन मागविले आणि त्यानंतर पुन्हा फेरसोडत घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज रविवारी ही फेरसोडत झाली आहे. या आरक्षण सोडतीबाबत १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध होईल. त्यावर हरकती आणि सूचना मागविल्या जातील. विभागीय आयुक्तामार्फत २४ ऑक्टोबरपर्यंत आरक्षण अंतिम करून २८ ऑक्टोबर रोजी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

ती तांत्रिक चूक – उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे…यापूर्वीच्या आरक्षण सोडतील झालेली बाब ही तांत्रिक चुकीमुळे झाली होती. प्रशासकीय यंत्रणेने आयोगाच्या सूचनेप्रमाणेच आरक्षण सोडत केली होती. दहा प्रभागातील आठ प्रभाग हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. त्यात तीन इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गातील महिलांनाही संधी देणे आवश्यक होते. यासाठी ईश्वरी चिठ्ठी काढावी लागली. त्यातून हा सर्व प्रकार पुढे घडला असेही बिलोली उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!