
नांदेड – जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये प्रलंबित अर्जांची वाढत असलेली संख्या पाहता नागरिकांचे अर्ज वेळेत निकाली काढणे आवश्यक होते. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यामध्ये मिशन समाधान अंतर्गत तक्रार निवारण दिन अर्थात जनता दरबार आयोजित केला. या पहिल्या जनता दरबारात स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर असे एकूण ३१७ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. यामध्ये पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्वतः ३८ अर्ज भाग्यनगर ठाण्यात निकाली काढले.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर प्रलंबित असलेले सर्व अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले. याच अनुषंगाने त्यांनी जनता दरबाराचे आयोजन करण्याबाबत एक पाऊल उचलले. मिशन समाधानांतर्गत तक्रार निवारण दिन आयोजन केले. ११ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ११ पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या तक्रार निवारण दिन अर्थात ‘जनता दरबार’मध्ये खुद्द पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार हे भाग्यनगर ठाण्यात उपस्थित राहिले. त्यांनी ३८ तक्रारींचे निवारण केले. त्याचवेळी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी शिवाजीनगर ठाण्यात उपस्थित राहून ४१ तक्रारींचे निवारण केले आहे.
जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनाही त्यांच्या उपविभागातील एका पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रारीचे निवारण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी २३८ स्थानिक आणि वरिष्ठ अर्ज निकाली काढले. या जनता दरबारमध्ये भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार सहभागी झाले होते.
दर शनिवारी भरणार जनता दरबार..! नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून यापुढे दर शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत तक्रार निवारणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहणार आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी दिलेल्या तक्रारीचे निवारण करून घ्यावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.



