
नांदेड – नांदेड जिल्ह्यात भोकर शहरासह भोकर तालुक्यातील पांडुरणा येथे १९ आणि २० सप्टेंबर रोजी बसलेल्या हादऱ्यानंतर आता नायगाव तालुक्यातही १२ ऑक्टोबर रोजी टाकळी बु. येथे भूगर्भातून आवाज आले आहेत. या आवाजाची प्रारंभी कोणतीही नोंद नसली तरीही अधिक अभ्यासांती या धक्क्यांची नोंद २.३ रिश्टर स्केल इतकी झाली आहे. त्यातील पहिला धक्का हा १.९ रिश्टर स्केलचा होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू खैरगावच्या आसपास असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
नायगाव तालुक्यातील टाकळी (बु) या गावात १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता, दुपारी ३ वाजता, सायंकाळी ५ वाजता आणि रात्री ९ वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरण्याची मालिकाच सुरू झाली होती. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली होती. त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता या आवाजाची, धक्क्याची कुठलीही नोंद झाली नसल्याचे आढळून आले. या आवाजाचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागाचे प्रा. डॉ. टी. विजयकुमार यांना माहिती घेण्याबाबत प्रशासनाने कळविले होते. त्यानुसार आज १३ ऑक्टोबर रोजी डॉ. विजयकुमार यांनी माहिती घेतली असता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागात सदर धक्क्यांपैकी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.५७ वाजता व रात्री ८ वाजून ५८ मिनिटं या दोन धक्क्यांची नोंद झाली आहे. या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे १.९ व २.३ एवढी नोंदविण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू केंद्रबिंदू खैरगांव गावाच्या आसपास असल्याचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थ सायन्स विभागाचे प्रा. डॉ. टी. विजयकुमार यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे. सदर धक्का हा अतिसौम्य प्रकारचा आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्टने फिट करून घ्यावीत. पुन्हा असा आवाज आलाच तर त्वरित घराबाहेर मोकळ्या जागेत गोळा व्हावे व प्रशासनाला (०२४६२) २३५०७७ या क्रमांकावर संपर्क करून कळवावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्ह्यात अशा पद्धतीचे कंपन हे अतिवृष्टीमुळे भूजल पातळीत होणाऱ्या पुनर्भरण अथवा उपसा यामुळे निर्माण होणाऱ्या हायड्रोस्टॅटिक दबावामुळे होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आल्याचे डॉ. टी. विजयकुमार यांनी जिल्हा प्रशासनास कळविले आहे. ही सामान्य बाब असून प्रतिवर्षी बऱ्याच भागात असे धक्के जाणवतात. गूढ आवाज येणे ही स्थानिक स्वरुपातील बाब असल्याचे यापूर्वी देखील निर्दशनास आले आहे. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याबाबत तहसीलदार नायगाव यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे.



