
नांदेड – राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई – गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कार्यालयीन मूल्यमापनाअंतर्गत झालेल्या या स्पर्धेत नांदेडने राज्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली.
राज्य शासनाने इ गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र वेबसाईट आपले सरकार, ई ऑफिस, डॅश बोर्ड, व्हाट्सअप चॅटबॉट, एआय ब्लॉक चेन युज, जीआयएस उपयोगिता या बाबींवर आधारित ही स्पर्धा घेतली होती. २०० गुणांची ही स्पर्धा होती. नांदेड पोलीस महानिरीक्षक कार्यालयाला २०० पैकी १२१.२३ गुण प्राप्त झाले आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या नागपूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक कार्यालयाला १२०.८८ गुण प्राप्त झाले आहेत.
कार्यालयीन कामकाजाच्या सुधारणेतील ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात ई – सेवांचा वापर वाढावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. या स्पर्धेअंतर्गत सर्वोत्तम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठवाड्यातील धाराशिव जिल्हा हा तिसऱ्या स्थानी तर लातूर जिल्हा चौथ्या स्थानी राहिला आहे. सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कार्यालयात मराठवाड्यातील एकही जिल्हा समाविष्ट नाही. विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत छत्रपती संभाजीनगर दुसऱ्या स्थानावर राहिले आहे. सर्वोत्तम महापालिकेतही मराठवाड्यातील एकही महापालिका समाविष्ट नाही. या स्पर्धेत जिल्हा परिषदांचा निकाल हा ८ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.



