सामाजिक

नांदेडचे जिल्हाधिकारी झाले सेवादार..!

हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा

नांदेड – “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी प्रत्यक्ष लंगर वाढून भाविकांची सेवा केली. या कार्यक्रमात ते प्रशासक, संयोजक ते सेवादार अशा वेगवेगळ्या भूमिका बजावत आपली जबाबदारी पार पाडत आहेत. जिल्हाधिकारी कर्डिले यांनी रांगेत बसलेल्या भाविकांना लंगर सेवा केल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह होताच पण जिल्हाधिकाऱ्यांनाही या सेवेमुळे एका मानसिक व अध्यात्मिक समाधानाचा अनुभव प्राप्त झाला.
शीख धर्मात सेवेला अत्यंत महत्त्व आहे. समता, बंधुभावाचा संदेश देणाऱ्या लंगर परंपरेचे महत्त्व पुन्हा एकदा या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी लंगर सेवेत प्रत्यक्ष सहभागी होत शीख परंपरेतील सेवाभाव, मानवता व समतेच्या मूल्यांना अभिवादन केले. हिंद दी चादर या कार्यक्रमात लंगर सेवा २४ तास भाविकांच्या सेवेसाठी खुली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री स. भगवंतसिंघ मान यांनी नांदेड जिल्हाधिकारी कर्डिले यांनी धारण केलेल्या पगडीचाही आपल्या भाषणात विशेष उल्लेख केला होता.

शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेड येथे देश-विदेशातून भाविक उपस्थित आहेत. संपूर्ण परिसर भक्तिमय व सेवाभावी वातावरणाने भारावून गेला आहे. या कार्यक्रमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचा जागर करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!