नांदेड – नांदेड जिल्हा हा संवेदनशील नव्हे तर आता शांतताप्रिय जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आपण प्रत्येकाने करून दिली पाहिजे, असे प्रतिपादन मावळते पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले. हे सांगताना त्यांनी भौगोलिक आणि सामाजिक वैविधता पाहता नांदेड जिल्ह्यातील क्राईम रेट कमी असल्याचे स्पष्ट केले. आता बाहेरील अधिकाऱ्यांना येथे यावे वाटले पाहिजे. नांदेडकरांच्या सहकार्याने दोन लोकसभा, एक विधानसभा महापालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडता आल्या. त्याचवेळी सण, उत्सवही शांततेत पार पाडले. नांदेडकरांचे सहकार्य हे कधीही न विसरण्यासारखे आहे, असेही अबिनाश कुमार यांनी सांगितले. नूतन पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनीही आगामी काळात नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारांसह अवैध धंद्यावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल,याची ग्वाही आपण देत असल्याचे स्पष्ट केले.
नांदेडमध्ये जिल्हा प्रशासन आणि आम्ही नांदेडकर या समूहाच्या वतीने शुक्रवारी जिल्हा नियोजन भवन येथे मावळते पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना निरोप आणि नूतन पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे स्वागत असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, अधीक्षक अभियंता गळधर, नांदेड तहसीलदार संजय वारकड, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आउलवार यांच्यासह जिल्हा कारागृह अधिकारी यांची पमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमामागील भूमिका संयोजक श्याम पाटील वडजे यांनी स्पष्ट केली. गतवर्षी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निरोपापासून आम्ही नांदेडकर या समूहाच्या वतीने कार्यक्रमाची ही परंपरा सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपर पोलीस अधीक्षक यांनी मावळते पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची कारकीर्द निश्चितच उल्लेखनीय राहिल्याचे सांगितले त्यांनी नांदेडमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली त्यामुळेच हे शांतता ठेवता आले त्याचवेळी नूतन पोलीस अधीक्षकही निश्चितच उल्लेखनीय कामगिरी करतील त्यांना हलक्यात घेऊ नका असा इशाराही दिला.
या सत्कार समारंभाला उत्तर देताना मावळते पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात एक विधानसभा, दोन लोकसभा, महापालिका, त्याचवेळी जिल्हाभरातील नगरपंचायतीच्या निवडणुका अगदी सुरळीत पार पडल्याचे सांगितले. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्याचवेळी पोलिसांच्या भूमिकेवरही कोणीही आक्षेप घेतला नाही. या कालावधीत अनेक व्हीआयपी मुव्हमेंट झाल्या. त्यामध्ये पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यासह अनेक वरिष्ठ जिल्ह्यात दाखल झाले होते. नांदेड जिल्हा हा संवेदनशील जिल्हा असल्याचे सांगितले जाते. मागचा इतिहास जोडून नांदेडची ही ओळख आहे; पण आता नांदेड हे सामाजिकदृष्ट्या परिपक्व झाले आहे. जिल्ह्यातील क्राईम रेट पाहता आता शांततामय जिल्हा असाच नांदेडचा उल्लेख करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले नांदेडमध्ये नव्या संस्कृती उदयास येत आहेत. संपूर्ण शहर रात्री दहा वाजता बंद करणे, मिरवणुका दहा वाजता आटोपणे, डीजे मुक्तीकडे वाटचाल करणे या सर्व बाबी नांदेडमध्ये घडत आहेत. त्यामुळे आता नांदेड शांतताप्रिय जिल्हा म्हणून पुढे येत आहे. हीच ओळख आपण प्रत्येकाने आता नांदेडची सांगणे गरजेचे आहे. ज्याद्वारे इतर ठिकाणाहून येणारे अधिकारी नांदेडला प्राधान्य देतील. नांदेड आपल्यासाठी विशेष आठवण म्हणून सदैव स्मरणात राहणार आहे. माझी मुलगी येथे मोठी झाली आहे. त्याचवेळी पहिली स्वतंत्र पोस्टिंगही नांदेडमध्ये मिळाली आहे. या सर्व प्रवासात सहकाऱ्यांची साथ मोलाची राहिल्याचेही अबिनाश कुमार यांनी सांगितले. अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचा त्यांनी भाऊ म्हणून उल्लेख केला. त्याचवेळी नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तसेच विद्यमान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही सदैव सहकार्याची भूमिका घेतली. त्यांच्या सहकार्यामुळेच राज्यात सर्वाधिक एमपीडीए कारवाया नांदेडमध्ये झाल्या आहेत. त्याचवेळी हद्दपारचाही आकडाही मोठा आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचेही विशेष मार्गदर्शन राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अनेक बाबी शिकता आल्या. अधिकाऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांशीही संवाद तसेच आपुलकी असणे गरजेचे आहे. हे त्यांच्याकडून शिकता आले. त्याचवेळी कोणतेही काम करताना ते परिपूर्णच असले पाहिजे हेही त्यांनी शिकवले. प्रशासकीय बाबीत आपण निश्चितपणे कमी होतो. उमाप यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या, असेही अविनाश कुमार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी जिल्ह्याच्या कारभारात महसूल आणि पोलीस या दोन विभागात योग्य समन्वय असणे गरजेचे असल्याचे सांगितले. हा समन्वय कायम राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. पोलीस विभागाकडून येणाऱ्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. जिल्ह्याच्या शांततेसाठी ही बाब आवश्यक होती. आपण रुजू झालो तेव्हा सुरुवातीला शहरात गोळीबार झाला. त्यावेळी माहिती घेतली असता यात नवीन काही नाही, आठ दिवसाला गोळीबार येथे गोळीबार होते असे सांगितले गेले; मात्र ही परिस्थिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी बदलली असेही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोपात विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे आव्हान पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी लिलया पेलले असल्याचे सांगितले. आता पोलीसिंग ही संगणकावर शिफ्ट झाली आहे. पोलिसांसाठी १५०० विविध पोर्टल आले आहेत. पोर्टलच्या माध्यमातूनच पोलिसिंग सुरू आहे. त्यामुळे आता पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना पोर्टलच्या माध्यमातून पोलिसिंगकडे शिफ्ट करण्याची आवश्यकता असल्याचेही सांगितले. नांदेड जिल्ह्यात महसूल आणि पोलीस यांनी एकत्रित येत मोठी कारवाई केली. जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी या बाबीची गरज होती. पोलीस दलात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात काम करताना नियुक्ती, बदली आणि निवृत्ती हा क्रम सर्वांसाठीच आहे; मात्र आपल्या कार्यकाळात आपण लोकांसाठी, पोलिसांसाठी काय करतो हे महत्त्वाचे आहे. याद्वारे लोक आपली आठवण काढतील. नांदेडला जे प्रेम मिळते ते इतर ठिकाणी मिळत नाही ही बाब सत्य असल्याचे आपण अनुभवातून सांगत असल्याचेही ते म्हणाले. मराठवाड्यातल्या मातीचा हा गुणधर्म आहे, तो मोठेपणा आहे. नाती टिकवण्यासाठी मराठवाड्यातील माणसं नेहमीच पुढे आहेत, असेही उमाप यांनी सांगितले. नूतन पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनाही नांदेडकरांनी मावळते पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना जसे सहकार्य केले तसेच सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमात जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या कार्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रतिक्रियांच्या माध्यमातून अविनाश कुमार यांच्या कार्याला उजाळा मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी मानले.
गुन्हेगारांसह अवैध धंद्यावरही कठोर कारवाई करू – डॉ. निलाभ रोहन….जगातील सर्वाधिक संवेदनशील ठिकाणावर म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये काम करण्याचा अनुभव असलेले, दहशतवाद विरोधी पथकात काम केलेले त्याचवेळी भारताच्या प्रमुख अंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थेत अर्थात रॉ मध्ये काम करण्याचा अनुभव असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी या सत्कार समारंभात अवघ्या दोन मिनिटात आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, जिल्ह्यात काम करत असताना पारदर्शकपणे कारभार केला जाईल. त्याचवेळी गुन्हेगारी थांबवण्यासाठी गुन्हेगारांसह अवैध धंद्यावरही निश्चितपणे कारवाई केली जाईल. जिल्ह्यात मावळते पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी चांगले काम केले आहे,तेच काम पुढे नेले जाईल. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील, ते आपण निश्चितपणे करू असेही ते म्हणाले यासाठी नांदेडकरांनी साथ द्यावी असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.