Police

परभणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे नांदेड कंट्रोल रूमला अटॅच..!

परभणी जिल्ह्यात वाळू वाहतुकीसह अवैध व्यवसायांना पोलीस निरीक्षक जबाबदार असल्याची तक्रार, स्थानिक गुन्हा शाखेचे आठ पोलीस कर्मचारीही परभणी पोलीस नियंत्रण कक्षाशी संलग्न, उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी उगारला कारवाईचा बडगा

नांदेड – परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक आणि इतर अवैध धंद्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जबाबदार असल्याची तक्रार नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप निरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना नांदेड कंट्रोल रूमला तर स्थानिक गुन्हा शाखेचे आठ पोलीस कर्मचारी परभणी जिल्हा पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला अटॅच केले आहेत. या संपूर्ण तक्रारीची चौकशी आता भोकर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. उमापांच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

परभणी जिल्ह्यातील अवैध व्यवसायासंदर्भात पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाली होती. १६ जून रोजी प्राप्त झालेल्या या तक्रारीत परभणी जिल्ह्यात वाळू वाहतूक आणि इतर अवैध व्यवसायांना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हे जबाबदार असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत सदर प्रकरणास जबाबदार असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना नांदेड कंट्रोल रूमला आणि स्थानिक गुन्हा शाखेतील इतर आठ पोलीस अंमलदारांना परभणी येथे पोलीस मुख्यालयी संलग्न करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायाविरुद्ध कठोर कारवाई करून ते नेस्तनाबूत करण्याच्या सूचना परभणी पोलीस अधीक्षकांना पोलीस उप महानिरीक्षक उमाप यांनी दिल्या आहेत. परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी पोलीस विभाग कटिबद्ध असल्याचेही पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील अवैध वाळू व्यवसायाला आळा कोण घालणार? परभणी जिल्ह्यातून वाहत येणारी गोदावरी नदी नांदेड जिल्ह्यातूनही वाहत तेलंगणात जाते. गोदावरी नदीतून थेट विष्णुपुरी प्रकल्पापासून धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्यापर्यंत जागोजागी अवैध वाळू उपसा सुरू आहे. जिल्ह्यात अधिकृतरित्या ९ जूनपासून वाळू उपसा बंद करण्याचे आदेश प्रशासकीय पातळीवर देण्यात आले असले तरीही या आदेशाला केराची टोपली दाखवत अवैध वाळू उपसा सुरूच आहे. पाऊस लांबल्याने वाळू मफीयांचे चांगभले झाले आहे. नांदेड लोहा तालुक्यात पोलिसांनी दर चार दिवसाला कारवाईचे सत्र सुरू ठेवले असले तरीही वाळू उपसा मात्र अद्यापही थांबला नाही. लोहा तालुक्यातील येळी घाट, मुदखेड तालुक्यातील म्हहाटी हे घाटही अविरत सुरूच असतात. नायगाव तालुक्यातील अनेक ठिकाणाहून गोदावरी नदीतून वाळू उपसा केला जातो. त्याचवेळी सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या मांजरा नदीच्या पात्रातून होणारा वाळू उपसा, वाहनांच्या दोन दोन किलो मीटरच्या रांगा पाहून जिल्ह्यातही अशा मोठ्या कारवाईची गरज आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात पर्यावरण विभागाने वाळू उपसा करण्यास मनाई केली असली तरी त्या मनाई आदेशाचे पालन मात्र ना महसूल विभागाकडून केले जाते ना पोलीस विभागाकडून. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!