धार्मिक

नांदेड गुरुद्वाराचा कारभार आता नव्या कायद्यानुसार..!

१९५६ चा जुना कायदा रद्द !, नवे निवडणूक नियमही लागू होणार, भाटीया समितीच्या शिफारशींनुसार राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

नांदेड : नांदेड येथील जगप्रसिद्ध ‘ नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब’ चा कारभार आता काळाच्या ओघात अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे. या गुरुद्वारासाठी तब्बल ७० वर्षांपूर्वी म्हणजेच १९५६ मध्ये करण्यात आलेला कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागच्यावतीने हा प्रस्ताव सादर केला. त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले , नांदेडच्या या गुरुद्वारामध्ये देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच प्रशासकीय कामकाजाची व्याप्तीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, १९५६ च्या कायद्यातील अनेक तरतुदी आता कालबाह्य झाल्याचे समोर आले होते. गुरुद्वाराचा कारभार अधिक पारदर्शक आणि सक्षमपणे चालवण्यासाठी कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी न्यायमूर्ती भाटीया समितीची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशींनुसारच आता सरकारने नवा कायदा आणण्याचे निश्चित केले आहे.

नवा कायदा काय असणार.. दि नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब अधिनियम, १९५६’ हा जुना कायदा रद्द केला जाईल. त्याऐवजी ‘दि तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा अधिनियम’ या नव्या कायद्याच्या प्रारूप तयार केले जाणार आहे. विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने या नव्या कायद्याचे प्रारूप अंतिम केले जाईल आणि विधिमंडळ अधिवेशनात मंजुरीसाठी सादर केले जाईल. विधीमंडळाच्या मान्यतेनंतर या कायद्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. त्यानंतर गुरुद्वाराचे नवीन नियम, निवडणूक नियम आणि उपविधी तयार केले जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!