महापालिका

नांदेडकरांनो… पाणी बचतीची सवय लावा- महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचे आवाहन 

अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला विष्णुपुरी प्रकल्पात दोन महिने पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक, शहरात आता दोनऐवजी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली..!

नांदेड – अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचे आगमन अद्यापही झाले नसल्याने नांदेडकरांची पाण्याची चिंता वाढली आहे. राज्यस्तरावरूनच अल निनो संकटाच्या उपाययोजनांना प्रारंभ केला आहे. त्याचवेळी नांदेड महापालिकेनेही आता खबरदारीच्या उपायोजना हाती घेतल्या आहेत. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात ऑगस्ट २६ अखेरपर्यंतचा जलसाठा शिल्लक आहे. आगामी काळातील जलसंकट पाहता पाणी बचत करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे. त्याचवेळी शहराला दोनऐवजी आता तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे.

राज्य शासनाकडून अल निनोचे संकट पाहता खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्याच अनुषंगाने मंगळवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वेगवेगळ्या जिल्ह्यातील जलसाठ्यांचा राज्य शासनाकडून आढावा घेण्यात आला. नांदेड वाघाळा महापालिकेनेही शहरात पाणी बचतीच्या केल्या जाणाऱ्या उपाययोजनाबाबत या बैठकीत माहिती दिली. महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह कार्यकारी अभियंता सुमंत पाटील तसेच पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात आजघडीला ऑगस्टअखेरपर्यंत शहराला पुरेल इतका जलसाठा असल्याची माहिती दिली. सध्या शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शहरास तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन विचाराधीन असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या बैठकीनंतर महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्याशी संपर्क साधला असता अल निनोचे संकट पाहता आगामी काळात जलसंकट ओढावणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडवासियांनी पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. राज्य शासनाकडूनही या संदर्भाने वेगवेगळ्या सूचना देण्यात येत आहेत. आता या पुढील काळात शेतीसाठी पाणी न देता सर्व पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. नांदेड शहराला सध्या होत असलेला दोन दिवसाआड पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्यासाठी तयारी करावी लागणार आहे. आजघडीला पाणी उपलब्ध आहे असे वाटत असले तरीही येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे स्वरूप तीव्र होणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी बचतीची सवय नागरिकांनी लावणे गरजेचे असल्याचेही आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!