
नांदेड : नांदेड शहरातील अशोकनगर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत वसंतराव नाईक पुतळा ते अशोकनगर या रस्त्यावर हॉटेल तुलसी कम्फर्टच्या समोरील मध्यवर्ती खांबावर अनिधिकृत बॅनर लावणाऱ्या वेदांत शैलेंद्र सबलोक, प्रतिमा शैलेंद्र सबलोक यांच्यासह बॅनर तयार करून लावणाऱ्या रुपेश शेळकेविरुध्द महापालिकेच्यावतीने विमानतळ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नवीन होर्डिंग्स धोरणानंतर महापालिकेने अनधिकृत बॅनर्स लावणाऱ्या विरुद्ध तिसरा गुन्हा दाखल करून शहरात विद्रुपीकरण होणार नाही याची दक्षता घेतली आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने मनपा हद्दीमध्ये जाहिरात फलक लावण्यासाठी एकूण १६७ ठिकाणे निश्चित केले आहेत. सदरील ठिकाणी जाहीरात फलकांच्या फ्रेम लावण्यात आलेल्या आहेत. त्या फ्रेमची साईजसुध्दा निश्चित करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये महानगरपालिकेने निर्धारीत केलेले शुल्क भरुन नागरीकांना, स्वंयसेवी संस्थांना तात्पुरती जाहिरात लावता येते. असे असतानाही शहरात अशोकनगर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत वाणिज्य स्वरूपाची जाहिरात विनापरवानगी लावण्यात आल्याची बाब २० जून रोजी निदर्शनास आल्याने महाराष्ट्र विरुपन प्रतिबंधक कायदा १९९५ चे कलम ३ चे उल्लंघन केल्यामुळे संबंधीत व्यक्ती विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन येथे महानगरपालिकेतर्फे तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्या तक्रारीवरून अनिधिकृत बॅनर लावणाऱ्या वेदांत शैलेंद्र सबलोक, प्रतिमा शैलेंद्र सबलोक यांच्यासह बॅनर तयार करून लावणाऱ्या रुपेश शेळकेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सदरील कारवाई महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधू यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकनगर क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी राजेश जाधव, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सचिन गजभारे, उत्तर नांदेडचे अतिक्रमण पथक प्रमुख दत्ता कल्याणकर व त्यांच्या अतिक्रमण पथकाने पार पाडली.
शहरातील नागरीकांनी व व्यापारी वर्गाने महापालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत स्थळावर परवानगी घेऊन होर्डींग्स लावावेत त्याचप्रमाणे अनधिकृत जाहिरात फलक लावून शहर विद्रुपीकरण न करता महानगरपालिकेस सहकार्य करावे अन्यथा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनधिकृत होर्डिंग व बॅनर लावणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर भूमिका घेत अशाच प्रकारे गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा महानगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.
अधिकृत होर्डिंगच्या परवानगीसाठी महापालिकेची सुलभ व्यवस्था…महापालिकेने होर्डीग्ससाठी ऑनलाईन स्वरुपात परवानगीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ४८ तासांच्या आत परवानगी मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्वांसाठी किमान ३ दिवसांची बॅनर, होर्डींग्स लावण्याची परवानगी दिली जाणार आहे. अतिशय अल्प दरात ही सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांना सदरील ठिकाणी होर्डिंग्स अथवा बॅनर लावण्यासाठी ऑनलाइन स्वरूपात परवानगी दिली जाते. या परवानगीसाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येतो. ऑनलाइन स्वरूपात अर्ज प्राप्त झाल्यानंतर क्षत्रिय अधिकारी त्यास परवानगी देतात. प्राप्त परवानगी पत्रावर शासन निर्णयानुसार क्यूआर कोड उपलब्ध करून दिला जातो. तो बॅनरच्या दर्शनी भागावर लावणे अनिवार्य आहे. आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अजितपालसिंघ संधू नव्या जाहिरात धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.



