Police

नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्र आता डॉ. निलाभ रोहन यांच्याकडे..!

मावळते पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्याकडून बुधवारी स्वीकारला पदभार, हिंगोलीत अवघ्या सहा महिन्याच्या चमकदार कामगिरीनंतर आता नांदेडची जबाबदारी

नांदेड – अवघ्या सहा महिन्याच्या कार्यकाळात हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळूमाफियांसह गुटखा माफीयांना सळो की पळो करून सोडणारे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी आज २४ जून रोजी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्र हाती घेतली आहेत. मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्याकडून डॉ. निलाभ रोहन यांनी ही सूत्र स्वीकारली आहेत. ऑपरेशन फ्लश आउट, ऑपरेशन क्रॅक डाऊनच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी झालेल्या अबिनाश कुमार यांची शासनाने वेळेपूर्वीच बदली केली आहे. त्याबद्दलही आता चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे डॉ. निलाभ यांनाही हिंगोलीमध्ये केवळ सहा महिन्याचा कार्यकाळ प्राप्त झाला होता. या सहा महिन्यातही त्यांनी हिंगोली जिल्ह्यावर आपली छाप सोडली. आता नांदेडसारखा मोठा जिल्हा त्यांना आपल्या चमकदार कामगिरीसाठी खुणावत आहे.

डॉ. निलाभ हे मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. २०१९ च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत. २३ जून रोजी काढलेल्या आदेशात राज्य शासनाने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना पुणे शहर येथे उपायुक्त म्हणून पाठविण्यात आले आहे. नांदेडचा पदभार हा हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक असलेल्या डॉ. निलाभ रोहन यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानुसार डॉ. निलाभ हे आज बुधवारी दुपारच्या सत्रात नांदेडमध्ये दाखल झाले. त्यांनी मावळते पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्याकडून नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. हिंगोली येथे कार्यरत असताना डॉ. निलाभ यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी विशेष पथक स्थापन केली होती. या पथकाच्या माध्यमातून जिल्हाभर छापा सत्र सुरू केले. त्याचवेळी गुटखा विक्री तसेच अवैध वाळू वाहतुकीवर त्यांनी अंकुश घातला होता. गुन्हेगारांसह कामचुकार कर्मचाऱ्यांचेही ते हिंगोलीत कर्दनकाळ ठरले होते. त्यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली होती. नांदेडमध्ये कार्यरत असलेले तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती. त्यांच्याकडून पदभार घेत डॉ. निलाभ यांनी हिंगोलीची जबाबदारी स्वीकारली होती. कोकाटे हे हिंगोलीहून पुन्हा नांदेड येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांच्या पाठोपाठ सहा महिन्यातच डॉ. निलाभ हेही नांदेडमध्ये कोकाटे यांनी जबाबदारी सांभाळलेल्या पोलीस अधीक्षक पदावर रुजू झाले. हाही एक योगायोगच म्हणावा लागणार आहे.

नूतन पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना नांदेडमध्येही अवैध धंद्यावर कारवाईसाठी मोठा वाव आहे. जिल्ह्यात वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, अवैध दारू माफियांचे मोठे जाळे आहे. या बेलगाम अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे. त्यांच्या या कारवाई सत्राला ठाणेदार कसा प्रतिसाद देतात हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अवैध धंद्यावर कारवाईसाठी विशेष पथके स्थापन करणे निश्चितच गरजेचे आहे. हिंगोलीचा हा विशेष पथकांचा पॅटर्न नांदेडमध्ये ते राबवतील का याकडेही आता लक्ष लागले आहे. यापूर्वी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानरीक्षक असलेले आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घातला होता. आजही नांदेड पोलीस परिक्षेत्रात एक पथक कार्यरत आहेच. या पथकाने नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर अनेक कारवाया केल्या. या कारवाईनंतर त्या संबंधित ठाणे प्रमुखांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले होते; मात्र काही दिवसात पुन्हा त्या ठाणेदारांना ते ठाणे बहाल केले जात होते. पुढे पुढे तर आयजींच्या विशेष पथकांनी कारवाई केल्यानंतरही ठाणेदारांना अभय देण्यात आले. त्यामुळे पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीची चर्चाही सुरू झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!